• Wed. Mar 11th, 2026
    …तर महाराष्ट्र वारंवार अस्थिर होईल! शिंदे समर्थक अपक्ष आमदाराचा थेट इशारा; दादा रडारवर?

    Authored byकुणाल गवाणकर | Contributed by अभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 30 Jan 2025, 8:23 pm

    राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर आज पहिल्यांदाच पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. मात्र या समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेनेला वगळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर आज पहिल्यांदाच पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. मात्र या समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेनेला वगळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सेनेचे एकमेव आमदार असलेले विजय शिवतारेंना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यातून वगळण्यात आलं आहे. त्यानंतर जिल्ह्यातील अपक्ष आमदार शरद सोनावणेंनी महायुतीमधील मित्रपक्षांना इशारा दिला आहे. शरद सोनावणे शिंदे समर्थक आमदार आहेत.

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणेंनी माध्यमांशी संवाद साधला. नामानिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके, भाजपचे राहुल कुल यांना संधी देण्यात आली. पण सेना आमदार विजय शिवतारेंना डावलण्यात आलं. त्याबद्दल सोनावणेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार होतो, तिथे शिवसेनेचा विचार का होत नाही, असा सवाल त्यांनी विचारला.
    शिंदेंना घेरण्यासाठी भाजपचं तगडं प्लानिंग; नडणाऱ्या दादांवर जबाबदारी, आमदार पडू लागले भारी
    ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पुण्यात येणार आहेत. तेव्हा त्यांना भेटून मी जिल्हा नियोजन समितीत सेनेवर होत असलेल्या विषयावर चर्चा करणार आहे. त्यांच्यासोबत बोलून मार्ग निघेल अशी आशा आहे,’ असं सोनावणे म्हणाले. राज्यात महायुतीचं सरकार आहे. शिवसेना महायुतीत आहे. त्यामुळे शिवसेनेचाही विचार व्हायला हवा, असं सोनावणे म्हणाले.

    शिवसेनेवर वारंवार अन्याय होतोय का, असा प्रश्न सोनावणेंना विचारण्यात आला. त्यावर समन्वय राखता यायला हवा. कोणीही सेनेवर अन्याय करु नये. अन्यायाची बिजं रोवली गेली तर मग राजकीयदृष्ट्या वारंवार अस्थिर होईल, असा थेट इशाराच त्यांनी दिला. महाराष्ट्र अस्थिर होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घ्यावी, असं सोनावणेंनी म्हटलं.
    शिंदेंमुळे सारेच ताटकळले; उद्धवसेनेच्या आमदारांकडून तक्रारींचा पाढा; पण चर्चा आदित्य ठाकरेंची
    राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली आज नियोजन समितीची बैठक झाली. विशेष म्हणजे अपक्ष आमदार शरद सोनावणे अजित पवारांच्या आमदाराचा पराभव करुन विधानसभेत पोहोचले आहेत. शरद सोनावणे शिंदे समर्थक आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या अतुल बेनके यांना पराभवाचा धक्का देत सोनावणे दुसऱ्यांदा विधानसभेवर गेले. त्याआधी २०१४ मध्ये त्यांनी मनसेकडून लढत विधानसभा निवडणूक जिंकली होती. तेव्हा ते मनसेचे एकमेव आमदार होते.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed