महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीतील विजय भारतीय जनता पक्षाला पचवता आलेला नाही. ईव्हीएमच्या कृपेनं, सगळ्या सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन त्यांच्या मदतीनं भाजपनं विजय मिळवला. हिंमत असेल तर ईव्हीएम बाजूला ठेवा. मग बघा, असं थेट आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलं. मी मैदान सोडणाऱ्यांपैकी नाही. कितीही वार केलेत तरी हार मानणार नाही. मैदान मारल्याशिवाय मैदान सोडणार नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी पुन्हा एकदा लढण्याचा निर्धार बोलून दाखवला.
ठाकरेंच्या मेळाव्यातील पोवाड्यात राज ठाकरेंचा उल्लेख; शिवसैनिकांनी कान टवकारले, काय घडले?
अमित शहा उद्या महाराष्ट्रात येत आहेत. मागच्या वेळी ते महाराष्ट्रात आले, तेव्हा माझ्यावर टीका करुन गेले. उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली बोलून गेले. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. माझी जागा कुठेय ते अमित शहा ठरवणार नाहीत. माझी जागा शिवसैनिक ठरवतील. शिवसेनेच्या अंगावर जितके याल, तितके वळ घेऊन दिल्लीला परत जाल, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अमित शहांना लक्ष्य केलं.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्व सोडल्याची टीका करतात. आमचं हिंदुत्त्ववादी सुधारणावादी आहे. ते बुरसटलेलं नाही. तुमच्या हिंदुत्त्वाची व्याख्या काय, असा सवाल उद्धव यांनी शहांना केला. देशप्रेमी मुस्लिमांनी लोकसभेला शिवसेनेला मतदान केलं, तर पोटशूळ उठला. तुम्ही आम्हाला हिंदुत्त्व शिकवता का? आमचा झेंडा भगवा आहे. तुम्हाला मुस्लिमांचं इतकं वावडं आहे, तर मग तुमच्या झेंड्यातून हिरवा रंग काढून दाखवा, असं थेट आव्हान ठाकरेंनी शहांना दिलं.
यावेळी ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचार घेतला. शिंदेंचा उल्लेख चिरकनाथ असा करत ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. आता ते सारखे रुसून बसायला लागले आहेत. रुसू बाई सुरु गावाला जाऊन बसू अन् डोळ्यात आसू, अशी त्यांची अवस्था आहे, असा चिमटा ठाकरेंनी काढला. मनासारखं काही झालं नाही, खुर्ची मिळाली नाही, खाती मिळाली नाही की हे चालले गावाला, अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदेंना लक्ष्य केलं.