मुंबई, दि. 23 : संपूर्ण जगासाठी आकर्षण आणि प्रेरणादायी ठरणारे, दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जागतिक दर्जाचे करावे. एप्रिल 2026 पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्याचा मानस असून स्मारकाचे काम दर्जेदार करावे, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या. तसेच स्मारकासाठी लागणारा निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जात असल्याचेही मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले. दादर इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाची आज मंत्री श्री. शिरसाट यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, सहायक आयुक्त प्रसाद खैरनार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी स्मारकामध्ये उभारण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा, स्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.
सध्या येथील इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. या स्मारकामध्ये शंभर फूट उंच पीठावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूने आच्छादित ३५० फुट उंचीचा पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. या स्मारकाचा संपूर्ण परिसर हरित असेल, या ठिकाणी एक हजार आसन क्षमता असलेले सभागृह, संशोधन केंद्र, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय व भूमिगत वाहनतळ असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
*****
शैलजा पाटील/विसंअ/