ठाणे,दि.20(जिमाका):- जंगलातील मध्यवर्ती भागामध्ये स्थानिक फळझाडे लावावीत. यामध्ये रायवली आंबा, बोर, जांभूळ या रोपांची लागवड करावी, बहाडोली जांभूळ (पालघर) तसेच आंबा कलम करून त्यांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करावीत. ही रोपे जंगलाच्या मध्यवर्ती भागात लावल्यामुळे जंगलातील मांसभक्षी प्राण्यांच्या भक्ष्यांची संख्या या भागात वाढून मनुष्य-वन्यजीव संघर्ष कमी होईल, अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक वनाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.
वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या विविध विषयांवर आढावा घेण्याकरिता शुक्रवार, दि.17 जानेवारी 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर (भा.प्र.से.), प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख शोमिता बिश्वास (भा.व.से.), प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौर तसेच भारतीय वनसेवेतील इतर वरिष्ठ वनाधिकारी, क्षेत्रीय वनकर्मचारी वनविभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व विभाग प्रमुखांनी वनमंत्री गणेश नाईक यांना प्रत्येक विभागाचा आढावा दिला. यामध्ये कॅम्पा, वन्यजीव, अर्थसंकल्प तरतूदी FCA, संरक्षण, कांदळवन कक्ष, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ इत्यादी विभागांचा समावेश होता.
वनमंत्री गणेश नाईक हे 1995 ला वन विभागाचे मंत्री असताना त्यांनी जपान येथील सुमीटोमो कॉर्पोरेशन सोबत महाराष्ट्र वन विभागाचे महामंडळ म्हणजेच फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये करार करून वृक्ष लागवड करण्याची योजना व सुमीटोमो कॉर्पोरेशन मार्फत निधीबाबत करार केला होता. याच धर्तीवर आता जगातील इतर देशातील कॉर्पोरेशन सारख्या इतर यंत्रणासोबत संपर्क साधून वनविभागाकरिता नाविन्यपूर्ण प्रस्ताव तयार करून निधी उपलब्ध करण्याकरिता वन अधिकारी यांचे शिष्टमंडळ तयार करण्याच्या सूचना श्री.नाईक यांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना दिल्या.
वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी पाठविणार असून वनामधील कोर भागामध्ये स्थानिक फळझाडे लावण्याबाबत सूचना दिल्या. यामध्ये रायवली आंबा, बोर, जांभूळ या रोपांची लागवड करा, बहाडोली जांभूळ (पालघर) तसेच आंबा कलम करून त्यांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करावीत. ही रोपे जंगलातील मध्यवर्ती भागात लावल्यामुळे त्या भागात मांसभक्षी प्राण्यांच्या भक्ष्यांची संख्या वाढून मनुष्य वन्यजीव संघर्ष कमी होईल.
वनमंत्री महोदयांनी पुढील काळामध्ये प्रत्येक आठवड्याला एका जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले. या दौऱ्यांची सुरुवात कोकणातून करणार असून समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या कांदळवनाची परिस्थिती पाहण्याकरिता जहाजाने समुद्री प्रवास करण्याकरिता नियोजनाबाबत सूचना दिल्या.
वनमंत्री महोदयांनी अटल सेतू ब्रिज वरून कांदळवनाची पाहणी केली असून तेथील खाडीलगतच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवनाचे रोपवन घेण्याकरिता स्थळ पाहणी करण्याच्या सूचना केल्या. क्षेत्रीय वन अधिकारी-कर्मचारी यांच्यासोबतच्या चर्चासत्रामध्ये वनमंत्री श्री.नाईक यांनी प्रत्येक संवर्गामधील वन कर्मचारी यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्याबाबत शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आश्वसन दिले.
शेवटी पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, वन्यजीव यांचे 2025 वर्षासाठीच्या दिनदर्शिकेचे तसेच भारतीय वन सेवेतील वन अधिकारी यांच्या सिव्हिल लिस्ट 2025 चे प्रकाशन वनमंत्री श्री.नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
00000