Saif Ali Khan Attack Update : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवत अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ठाणे पश्चिम येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पण पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर आरोपी शरीफुलने आपला फोन बंद ठेवला होता. दोन दिवस बंद असलेला फोन त्याने काही वेळासाठी सुरु केला. आणि याचवेळी पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले. तो ठाण्याच्या हिरानंदानी असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. नंतर तात्काळ पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी परिमंडळ सहाचे उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन आरोपीच्या मागावर तैनात केले.
दरम्यान चौधरी यांनीही चेंबुरच्या परिमंडळ कार्यालयात तपासासाठी तळ ठोकला होता. पोलिसांचे तांत्रिक पथक आणि मुबलक फौजफाटा घेऊन उपायुक्त ढवळेंनी हिरानंदानी इस्टेट गाठले. येथे पोहोचण्याआधी पोलिसांनी प्रवासादरम्यान या परिसराची भौगोलिक माहिती मिळवली होती. या इस्टेटमध्ये मजुरांची मोठी वस्ती असल्याचे त्यांना समजले. ज्यामध्ये बंगालसह अन्य राज्यांतून आलेले मजूर, त्यांची कुटुंब वास्तव्यासा आहेत. या वस्तीच्या मागे ३० ते ३५ एकर क्षेत्रात तिवरांचे जंगल आणि खाडी असा विस्तृत परिसर आहे.
नवनाथ ढवळेंच्या पथकाने लागलीच शोधकार्य सुरु केले. त्यांनी आधी मजुरांची संपूर्ण वस्ती पिंजून काढली. तरीही आरोपी काही हाताला लागला नाही. नंतर पोलिसांनी जंगलाकडे आपला मोर्चा वळवला. सायंकाळच्या वेळी अंधार झाला होता आणि ती जागाही पोलिसांसाठी नवखी होती. जंगल दाट तिवरांनी वेढलेले होते. अशातच जंगलातील उंचसखल भाग, चिखल आणि पाणी पायाखाली तुडवत पोलिसांनी वाट काढली आणि जंगलात केवळ एकदाच नव्हे तर दोनदा तपासणी केली.
तपासणीनंतरही आरोपी हाताला न लागल्याने पथक माघारी फिरण्याच्या बेतात होते. पण नवनाथ ढवळेंना मात्र कुणकुण लागली. मग त्यांनी तिसऱ्यांदा तपासणी करण्यास सांगितले. यात पोलिसांनी कोपरा न् कोपरा पिंजून काढला. तेव्हा दडून बसलेला आरोपी हाती लागला आणि अशाप्रकारे पोलिसांचे सुमारे सहा तासांचे सर्च ऑपरेशन यशस्वी ठरले आहे.