मुंबई, दि. 18 : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व भक्ती परपंरा चे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी, या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या कल्पनेतून व मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती संप्रदायावर आधारित भक्ती महोत्सव या तीन दिवसीय कार्यक्रमाचे वर्धा येथे आयोजन करण्यात येत आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तसेच सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या लोककला, नाट्य, आदिवासी कला महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे.
कीर्तन हे ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे आजही प्रबोधन व भक्तीचे माध्यम आहे. भक्ती संस्कृतीचा विचार नवमाध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी कीर्तन-भक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी भक्ती महोत्सव दिनांक 20 ते 22 जानेवारी 2025 या कालावधीत वर्धा येथील सभागृह, सार्वजनिक वाचनालय मगणवाडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
मृदंग, टाळ आणि पेटीच्या साथीने सादर होणारे भजन, अभंग ही महाराष्ट्राची ओळख आहे. पारंपरिक लोकगीते, भजन आणि अभंग मौखिक स्वरुपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत आले आहेत. सामाजिक जडणघडणीमध्ये या त्यांचा मोठा वाटा आहे. वर्धा येथे आयोजित भक्ती महोत्सवाचे उदघाट्न सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. या महोत्सवात ह.भ.प. आचार्य महंत श्री बाभुळगावकर बाबा शास्त्री, करमाड (संभाजीनगर), ह.भ.प श्रीमती ज्योती जाधव, सिंदखेड राजा जि.बुलडाणा यांच कीर्तन सादर होईल. तर मंगळवार 21 जानेवारी 2025 रोजी ह.भ.प. प्रा.गणेश महाराज भगत आळंदी, (पुणे) व ह.भ.प. प्रसन्ना शास्त्री रिद्धपूर, अमरावती यांचं कीर्तन सादर होईल. या भक्ती महोत्सवाचा समरोप बुधवार 22 जानेवारी 2025 रोजी होणार असून बुधवारी ह.भ.प. श्री मयुरजी महाराज, विश्वशांती धाम येळाकेळी, वर्धा, ह.भ.प.श्री प्रकाश महाराज भगत वाघ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम, ह. मु. वर्धा यांच व कीर्तनकार व प्रवचनकर श्रीमती प्राची गडकरी, मुंबई कीर्तन सादर होईल.
भक्ती महोत्सव या कार्यक्रमात सर्व मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार यांची भक्तीमय वाणी ऐकण्यासाठी वर्धा भागातील रसिकांनी उस्फूर्तपणे यावे हा कार्यक्रम सर्व-रसिक प्रेक्षकांना विनामूल्य उपलब्ध असून जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.