Chhagan Bhujbal on Ladki Bahin Yojana : आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवरुन मोठं वक्तव्य केलं आहे. जे नियमांत बसत नाहीत, त्यांनी स्वत:हून नावं काढा असं म्हणत योजनेचे नियम कठोण होण्याचे संकेत दिले आहेत.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, लोकांना असं आवाहन करायला हवं, की जे नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वत:हून आपली नावं काढा, असं महिलांना सांगायला हवं. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून जे पैसे मिळाले, सरकारकडून जे पैसे त्यांना देण्यात आले ते परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ज्या महिला नियमांत बसत नाहीत, त्यांच्याकडून आधी दिलेले पैसे परत मागू नयेत. मात्र यापुढे या नियमांत ज्या महिला बसत नाहीत, त्यांनी स्वत:हून आपली नावं काढून घ्यावीत, असं लोकांना सागावं. अन्यथा दंडासह वसुली करता येईल. मागचं जे झालं, ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करुन टाकलं, असं म्हणत त्यांनी आगामी काळात लाडकी बहीण योजनेचे नियम अधिक कठोर होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
अनेक महिलांकडून नियमांत बसत नसतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ
विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. जुलै २०२४ पासून २१ ते ६५ वर्षांच्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र ही योजना सरसकट सर्व महिलांसाठी नाही. या योजनेसाठी सरकारने काही नियम जारी केले आहेत. कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांहून अधिक नसावं, चारचाकी नसावी, एका घरात दोन महिलांना हा लाभ घेता येत नाही, असे काही नियम आहेत. या नियमांत ज्या महिला बसतील, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र असं असतानाही अनेक महिलांनी नियमांत बसत नसतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला मोठं यश मिळवून दिलं. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमांत बसत नाहीत, त्यांना या योजनेतून वगळणार असल्याचं सांगितलं. यावरुनच छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.