• Tue. Jan 7th, 2025

    संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये ९ जानेवारीला काम बंद आंदोलन

    संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये ९ जानेवारीला काम बंद आंदोलन

    महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ९ जानेवारीला एक दिवस काम बंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या वेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येनंतर महाराष्ट्रातील समाजमन हेलावले आहे. या महाभयानक हत्येमुळे राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य भयभीत झालेले आहेत. अनेक गावात ग्रामपंचायत कारभार करताना गावकारभारी दबावाखाली असतात. सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी, तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेने जाहीर केले आहे.

    अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने स्व. संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन येत्या गुरुवारी (९ जानेवारी) एक दिवस काम बंद आंदोलन करण्याचे परिषदेचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भातील निर्णय शासनाला कळवण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना ईमेलद्वारे याबाबत मागणी निवेदन दिले आहे.

    राज्यातील सर्वच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आणि ग्रामीण महाराष्ट्रातील गावखेड्यातील सामाजिक वातावरण चांगले राहण्यासाठी सरपंच व सर्वच गावकारभारी असणाऱ्या सहकाऱ्यांना संरक्षण असणे अत्यंत गरजेचे आहे. सरपंच हा पब्लिक सर्व्हन्ट असल्याबाबत तेलंगणा व राजस्थान उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाचाही निर्णय आहे. त्यानुसार सरपंचाच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पूर्वीचे भादवी ३५३, आताचे भारत न्यायसंहिता १३२ प्रमाणे गुन्हा नोंद व्हावा, तरच गावच्या विकासकामात अडथळा आणणाऱ्यावर जरब बसेल. गावच्या हितासाठी समाजसेवेमध्ये भाग घेणाऱ्या सरपंचांना व त्यांना मदत करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण अत्यावश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

    सरपंच परिषदेच्या शासनाकडे मागण्या:

    – सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा
    – प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण अनिवार्य करण्यात यावे
    – स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी
    – स्वर्गीय संतोष देशमुख कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरी द्यावी
    – स्व. संतोष देशमुख यांचे स्मारक त्यांच्या गावात उभे करावे
    – सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू व्हावे
    – ग्रामसभा सर्व ग्रामस्थांसाठी असल्याने ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये इतरांना कायद्याने प्रतिबंध असावा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed