Dhananjay Munde on Walmik Karad : महायुती सरकारची मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर मुंबईत पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहिले होते. यावेळी बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण छोटा आका आणि मोठा आका अशा पद्धतीची सर्वांची भाषा ऐकतोय. कुणाचा एन्काऊंटर अन् कुणाचं काय, अशा काही गोष्टी नाहीयेत. पोलीस प्रशासन आणि सीआयडी व्यवस्थितपणाने तपास करत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा आमचा पहिला उद्देश आहे. त्यामुळे कोणी काय बोलावं आणि कोणाचं काय होणार याला काही अर्थ नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेले पाहिजे पहिल्यांदा अशी मागणी विधानसभा अधिवेशनावेळी मी केली होती. या प्रकरणातील राहिलेल्या आरोपींना अटक करून चार्जशीट दाखल करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
मी मंत्री राहून या प्रकरणातील तपासावर कुठल्याही प्रकारचा दबाव होऊ शकत नाही. म्हणूनच सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन तपास होणार आहे. मीच पालकमंत्री आणि मंत्री का नसावं हा विरोध करणारे लोकं आहेत त्यांना विचारावं. सर्वपक्षीय आमदार एकवटले ते निर्घृण हत्येबाबतीत आहेत. त्यामुळे ते चुकीचं झालं असं म्हणता येत नाही. त्या घटनेमध्ये जे-जे दोषी असतील त्यांना फाशी व्हावी हीच भूमिका सर्वांची होती तीच आमची असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं. यावेळी बोलताना बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील ते आमचे अजितदादा घेतील, असं मुंडेंनी स्पष्ट केलं.

