• Wed. Jan 1st, 2025
    शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन, ठाण्यातील रुग्णालयात वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास

    Former Shiv Sena MP Satish Pradhan Passed Away : ठाण्याचे नगराध्यक्षस, पहिले महापौर आणि माजी खासदार सतीश प्रधान यांचे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    विनित जांगळे, ठाणे : ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे माजी राज्यसभा खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी दुपारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ होते. त्यांच्या पश्चात मुलगा कमलेश, सून मानसी, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत काम केलेल्या शिवसैनिकांपैकी जुना – जाणता शिवसैनिक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

    १९७४-८१ या कार्यकाळात ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान यांनी काम पाहिले. शहरात शिवसेनेची पाळेमुळे रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर १९८६-८७ या काळात त्यांनी शहराचे पहिले महापौरपद भूषविले. यासोबत शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केले. यासोबतच शहरातील विविध क्रीडा संस्थांचे प्रमुख म्हणून प्रधान यांनी काम पाहिले.
    ‘लाडकी बहीण’मध्ये बांगलादेशी महिलांची घुसखोरी? योजनेवरुन देवकीनंदन ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
    ठाण्यातील मुलांच्या शैक्षणिक जडणघडणीसाठी सतीश प्रधान यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते. रविवारी, दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी दहा वाजता ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

    इंग्रजी जीआरला विरोध

    पूर्वी राज्य सरकारचे सर्व जीआर इंग्रजीतून पाठविले जात. १९७४ साली सतीश प्रधानांनी या इंग्रजी जीआरला कडाडून विरोध करत ते मराठीत पाठवा नाही, तर उग्र आंदोलन करू, असा इशारा सरकारला दिला. त्यानंतर राज्य सरकारने मराठीत जीआर काढण्यास सुरवात केली.

    शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन, ठाण्यातील रुग्णालयात वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास

    बड्या वास्तूंचे शिल्पकार

    १९८२ साली ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रधान ठाण्याचे पहिले महापौर झाले. त्या दिवसापासून शहराने सांस्कृतिक कात टाकण्यास सुरूवात केली. सतिश प्रधान यांनी ठाण्याला नवे बदल स्वीकारण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशस्त वास्तूंची निर्मिती झाली. गडकरी रंगायतन व दादोजी कोंडदेव क्रीडा सभागृह ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. सांस्कृतिक विकासाद्वारेच त्यांनी लहान मुलांवर मैदानी संस्कार करण्याच्या हेतुने ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली प्रधान यांनी रोवली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed