• Thu. Dec 26th, 2024
    सहलीचा आनंद क्षणात मावळला, अवघ्या ३४ वर्षांचा कुटुंबाचा आधार काळाने गिळला

    | Contributed byआशिष मोरे | | Updated: 25 Dec 2024, 1:04 pm

    Buldhana Accident : बसच्या इंजिन मध्ये पाणी टाकण्यासाठी मोहम्मद मुसब अब्दुल जाबीर वय वर्ष ३४ हे स्कूलबसमधून खाली उतरले. पाणी टाकून होताच विरुद्ध दिशेने येणारी कार स्कूल बसवर धडकली. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच क्षणार्धात सर्व संपले. जणू काही मृत्यू त्याची वाटच पाहत होता.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमोल सराफ,बुलढाणा : सतत घडणाऱ्या अपघातांमुळे, एकदा घरातून बाहेर निघाल्यानंतर पुन्हा सुस्थितीत घरी परत येऊ की नाही, अशी शंका प्रवासासाठी निघाल्यावर मनात येणं सहाजिक झाले आहे. अशीच एक अपघाताची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेने सगळीकडे एकच शोकाकुल वातावरण झाले आहे.

    रविवारी रात्री दीड वाजताची वेळ. मोताळा येथील वीज मंडळाच्या सबस्टेशन समोर स्कूल बस उभी केल्यानंतर, त्या बसच्या इंजिन मध्ये पाणी टाकण्यासाठी मोहम्मद मुसब अब्दुल जाबीर वय वर्ष ३४ हे स्कूलबसमधून खाली उतरले. पाणी टाकून होताच विरुद्ध दिशेने येणारी कार स्कूल बसवर धडकली. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच क्षणार्धात सर्व संपले. जणू काही मृत्यू त्याची वाटच पाहत होता.

    मोहम्मद मुसब अब्दुल जाबीर हे पिंपळगाव काळे येथील बी एस पटेल महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर होते. त्यांच्या कुटुंबात वयस्कर आई-वडील, पत्नी, सहा व दोन वर्षांच्या दोन मुली आहेत. संगणकाचे परिपूर्ण ज्ञान, अत्यंत हुशार व बुद्धिमत्ता, सुसंस्कृत सभाव त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना ते प्रिय होते .

    मोहम्मद मुसब अब्दुल जाबीर यांचे जिवलग मित्र जळगाव नगरात खाजगी शिकवणी वर्ग घेतात. त्यांनी शिकवणी वर्गतील विद्यार्थ्यांची सहल छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी नेली होती. सहलीमध्ये ते मित्राच्या आग्रह वरून सहभागी झाले होते .सहल आटपून सर्व विद्यार्थी व शिक्षक जळगाव जामोदकडे येत होते. बस मोताळा येथील वीज मंडळाच्या सबस्टेशन पर्यंत पोहोचल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली. इंजिन मध्ये पाणी टाकण्यासाठी ते खाली उतरले पाणी टाकून बस मध्ये येण्यापूर्वीच सर्व काही संपले.

    विरुद्ध दिशेने येणारी भरधाव कार सरळ त्यांच्यावर धडकली. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांचा मित्र यांच्या डोळ्यांसमक्ष क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेने शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, संचालक मंडळ सुन्न झाले.
    या घटनेने नियती किती क्रूर असते याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed