Shahapur Crime News: शहापूर येथे भर रस्त्यात ज्वेलर्स दुकानाच्या मालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दुकानाच्या सेल्समनचा मृत्यू झाला आहे.
दिनेशकुमार माणाराम चौधरी (वय २५) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या सेल्समनचे नाव असून याप्रकरणी दुचाकीवरुन येऊन गोळीबार करणाऱ्या दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा गोळीबार कुठल्या कारणास्तव करण्यात आला त्याचा शोध शहापूर पोलीस घेत आहेत.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मृत दिनेश कुमार चौधरी हा महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात सेल्समनचे काम करत होता. तो नेहमीप्रमाणे दुकान मालक आणि दिनेश दोघेही शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दुकान बंद करून निघाले होते. याच दरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला. यात चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. मात्र, रविवारी (२२ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गोळीबार करणारे दोघेही हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेमुळे शहापुरात एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबार करणाऱ्या अज्ञात इसमांनी कुठल्या कारणास्तव गोळीबार केला, त्याचा शोध शहापूर पोलीस घेत आहेत. तर, दुसरीकडे या गोळीबाराच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटना करीत आहेत. या दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मालक आणि सेल्समनवर गोळीबार करून सेल्समन जवळ असलेली बॅग पळवली, या बॅगमध्ये महत्त्वाचे कागदपत्र असल्याचं सांगितलं जात आहे.