Pune Crime News : पुण्यातील कात्रजमध्ये दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार अमोल आडमला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपी सोलापूरला पळून जाण्याच्या तयारीत होता. १७ डिसेंबर रोजी साईनगर गल्लीत सात जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला होता. आडमवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याचा मित्र इशांत कोकाटे आरोपींनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपींनी ‘तू आम्हाला जाब विचारणारा कोण, असे बोलून आरोपींनी तक्रारदाराला मारहाण केली. आडमने कोयत्याने तक्रारदाराच्या मित्राच्या मानेवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्या वेळी तक्रारदार जीव वाचविण्यासाठी पळताना पाय घसरून पडले. तेव्हा आरोपीने तक्रारदाराच्या डोक्यावर, हातावर आणि अंगावर कोयत्याने वार केले. यात तक्रारदार आणि त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले. त्यानंतर टोळके पसार झाले.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपी आडम पुणे सोडून मूळ गावी सोलापूरला पळण्याच्या तयारीत होता. ही माहिती स्वारगेट पोलिस ठाण्यातील अंमलदार कुंदन शिंदे आणि तांबे यांना मिळाली. स्वारगेट पोलिसांनी एसटी स्थानकात सापळा लावून आडमला पकडले आणि त्याला आंबेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, कुंदन शिंदे, राहुल तांबे, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, सतीश कुंभार, विक्रम सावंत आदींनी केली. आरोपी अमोल आडमवर भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा इत्यादी पोलिस ठाण्यात अपहरण, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत यांसारखे अतिगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.