Kurla Bus Crash: कुर्ल्यात सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बस अपघाताचं बसच्या आतील भागतील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये खच्चून भरलेली बस दिसत आहे.
बेस्टच्या १३२ क्रमांकाच्या बसनं सोमवारी रात्री ९ वाजून ३६ मिनिटांनी अनेकांना चिरडलं. बसचा वेग अचानक वाढला. त्यानंतर ती अनेक वाहनांना, पादचाऱ्यांना धडक देत, चिरडत पुढे निघाली. बसचा वेग अचानक कसा वाढला ते आतल्या प्रवाशांच्या लक्षात आलंच नाही. बस भरधाव वेगात जाऊ लागताच प्रवासी घाबरले. बाहेर पाहिल्यावर त्यांना अपघाताचा काहीसा अंदाज आला. बसचा वेग अचानक वाढताच प्रवासी प्रचंड भेदरले. ते जीव मुठीत धरुन बसले.
Kurla Bus Accident: ‘तो’ नकार अनामच्या जीवावर बेतला; बस अपघातात २० वर्षीय तरुणीचा अंत; ‘त्या’ रात्री काय घडलं?
९ वाजून ३६ मिनिटांनी बसचा वेग अचानक वाढला. त्यानंतर पुढच्या २० ते २५ सेकंदांत बसनं २२ वाहनांना धडक दिली. अनेक जणांना चिरडलं. २५ सेकंद भरधाव वेगात धावणारी बसनंतर कमानीत घुसली आणि थांबली. कमानीला जोरदार धडक दिल्यानं बस थांबली. त्यामुळे इलेक्ट्रिक बसच्या काचा फुटल्या. त्यावेळी रस्त्यावर हलकल्लोळ माजला होता. पुढची काही सेकंद प्रवासी बसमध्येच होते. बसच्या काचा फुटलेल्या असल्याचं लक्षात येताच त्यांनी बाहेर उड्या टाकल्या.
Kurla Bus Accident: ‘त्या’ बेस्ट बसच्या चालकाला फक्त ३ दिवस…; अपघातानंतर तपासात धक्कादायक बाब उघड
बेस्ट बसच्या अपघातात ७ जणांचा जीव गेला. तर ४८ जण जखमी झाले. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचा चालक संजय मोरे सध्या पोलीस कोठडीत आहे. क्लच समजून ऍक्सिलेटर दाबल्यानं बसचा वेग अचानक वाढला आणि अपघात घडला, असं मोरेनं चौकशीत सांगितलं आहे. त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोरेला अवघ्या ३ दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं. त्याला मोठी बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. याआधी त्यानं मिनीबस चालवल्या होत्या. कंत्राटी पद्धतीनं तो १० दिवसांपूर्वी रुजू झाला होता.