Mumbai Crime : दारुच्या व्यसनापायी पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना मुंबईत घडल्याचे वृत्त समोर येत आहे. मुंबईतील ट्रॉम्बे परिसरात पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी अमोल पवार याला चेन्नई येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कर्ज आणि दारूच्या व्यसनामुळे पत्नीसोबत त्याचा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल पवार याने ४०-५० जणांकडून उसने पैसे घेतले होते. पैसे परतफेड करण्यास असमर्थ असल्याने आणि दारूचे व्यसन यामुळे तो पत्नीकडे सतत दागिन्यांची मागणी करुन तीच्याशी भांडण करत असे. २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या भांडणात अमोलने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून केला आणि आई व बहिणीला फोन करून घटनेची माहिती दिली.
पतीने पत्नीचा खून केला
हत्येनंतर अमोलने नवी मुंबईमार्गे दिल्ली गाठली त्या दरम्यान त्याने मोबाईल बंद केला होता. दिल्लीत आल्यावर त्याने ओला चालकाच्या फोनवरून नातेवाईकांना फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पोलिसांनी अमोलचा कॉल ट्रेस करून तो चेन्नईला जात असल्याची माहिती मिळवली. पोलिसांचे एक पथक चेन्नईला पोहोचले आणि त्यांनी आरोपीला पकडण्याची योजना आखली. काही दिवसांनी अमोलने पुन्हा त्याच्या नातेवाईकांना फोन केला, त्यावेळी पोलिसांनी त्याचा माग काढत १५ मिनिटांत त्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी त्याला मुंबईत आणले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चेन्नई येथून आरोपीला अटक
या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त नवनाथ ढवळे, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाराम वळवी यांच्या पथकाचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे.