• Fri. Dec 27th, 2024
    आताची सर्वात मोठी बातमी! ते पुन्हा आले, भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

    Devendra Fadnavis BJP Group Leader : भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एकमताने सर्व आमदारांनी निवड केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून पक्ष निरीक्षक म्हणून निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर शपथविधी घेणार हे निश्चित झाले आहे. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. तर या प्रस्तावाला भाजपच्या आमदारांनी अनुमोदन केलं.

    महायुतीकडे २३७ जागा असून त्यामध्ये भाजपच्या १३२ जागा तर पाच अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचे संख्याबळ १३७ झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली. भाजप गटनेतेपदी निवड झाल्यावर आता महायुती सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दुपारी राज्यपालांकडे जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधीमध्ये देवेंद्र फणडवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे २१ मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. देवेंद्र यांची निवड झाल्यावर राज्यभरात भाजपच्या समर्थकांनी आनंदा साजरा केल.

    या विधीमंडळ बैठकीला पंकजा मुंडे, मनिषा चौधरी, प्रविण दरेकर, पराग अळवणी, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, गिरिश महाजन, रविंद्र चव्हाण, सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर,विनोद तावडे, अतुल सावे, शिवेंद्रराजे भोसले, राहुल नार्वेकर, चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

    गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचा गटनेता कोण याची चर्चा होत असलेली पाहायला मिळाली. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षांनी आपल्या गटनेत्यांची घोषणा केली होती. भाजपकडून कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसतील.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed