Mumbai News: एका कारखान्यात सोन्याची तार काढण्याची सुमारे अडीचशे किलो वजनाची मशिन दोन कारागिरांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला आहे.
झवेरी बाजारातील तेलगल्लीमध्ये मन्सूर शेख यांचा तारपट्ट्याचा कारखाना आहे. या कारखान्यात आठ कारागीर काम करतात. हे सर्व कामगार याच ठिकाणी राहतात. रविवारी रात्री काही कारागीर अंथरुणावर पडून गप्पा मारत होते. मध्यभागी असलेल्या सुमारे अडीचशे किलो वजनाच्या मशिनच्या एका बाजूला दोघे, तर दुसऱ्या बाजूला सहा कारागीर होते. मोबाइल पाहत असताना काही जण मस्ती करू लागले. यादरम्यान त्यांचा धक्का लागल्याने मशिन दुसऱ्या बाजूला झोपलेल्या सौम्य रॉय आणि अनुपम घोष यांच्या अंगावर पडली. इतर कारागिरांनी या दोघांना बाहेर काढले. त्यांना तत्काळ जी. टी. रुग्णालयात नेले. परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अनुपम याचा मृत्यू झाला, तर सौम्य याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम; पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, कारागिरांना राहण्यासाठी किंवा काम करताना कोणतीही सुरक्षेची काळजी घेण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. अनुपम याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी कारखानामालक मन्सूर शेख, कारागीर मंगल मंडल, स्वरूप घोष, तसेच या जागेचे मालक उत्तम माझी आणि अजित छेडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिलासादायक बातमी! भारतात HIV संसर्गात ४४ टक्क्यांनी घट; मृत्यूचेही प्रमाण घटले, काय सांगते आकडेवारी?
अनेकदा कारवाई
काळबादेवी, भुलेश्वर, विठ्ठलवाडी, नारायणवाडी, तेलगल्ली, सट्टागल्ली, झवेरी बाजार, पोफळीवाडी क्रमांक एक ते तीन, खंडेराव वाडी, सी. पी. चाळ, फणसवाडीतील सुमारे १०० वर्षे जुन्या चाळींमधील घराघरांमध्ये सुवर्णउद्योग सुरू असला, तरी सुरुवातीला या व्यवसायात गॅस सिलिंडरचा वापर केला जात नव्हता. मेणाचा वापर करत रॉकेलच्या चिमणीवर पारंपरिक पद्धतीच्या फुंकणीने दागिन्यांच्या घडणावळीचे काम सुरू असे. आता चिमणीचा वापर करून काम केले जात असल्याने प्रदूषणाच्या अनेक तक्रारी असतात. पालिकेकडून या कारखान्यांवर अनेकदा कारवाई करण्यात येते, मात्र काही दिवस बंद ठेवल्यानंतर पुन्हा कारखाने सुरू केले जातात.