MNS Leader Bala Nandgaonkar: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास राहिलेले आहे. गेल्या पाच वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व घडामोडी पाहता मतदारराजा काय निकाल देणार आणि त्यातून कोणाचा निकाल लावणार या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळेल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर सध्या घडामोडींना, बैठकांना जोर आला आहे. फडणवीसांनी भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पराग शाह, मिहीर कोटेचा, कालिदास कोळंबकर, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा या प्रमुख नेत्यांची हजेरी होती. विशेष म्हणजे ही बैठक सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार बाळा नांदगावकर पोहोचले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
बंडखोर, अपक्षांवर नजर; फडणवीसांचे ६ शिलेदार सक्रिय; सूरत प्लान यशस्वी केलेले तिघे मोहिमेवर
बाळा नांदगावकर शिवडीतून मनसेचे उमेदवार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि मनसेची छुपी युती असल्याची चर्चा झाली. राज्यात महायुतीची सत्ता येईल, मनसेच्या पाठिंब्यानं भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी विधानं राज ठाकरेंनी निवडणूक सुरु असताना केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या भेटीसाठी नांदगावकर पोहोचल्यानं चर्चांना उधाण आलं. सत्ता स्थापनेसाठी लहान पक्षांची गरज भासल्यास भाजपनं तशी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे नांदगावकरांची भेट लक्षवेधी ठरली.
एका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेलो होतो, असं स्पष्टीकरण नांदगावकर यांच्याकडून देण्यात आलं. ‘भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या लेकाचं लग्न आहे. ते पत्रिका देण्यासाठी राज यांच्याकडे आले होते. नंतर ते पत्रिका देण्यासाठी फडणवीसांकडे जाणार होते. आपण सोबत जाऊ या, असं त्यांनी म्हटलं. म्हणून मी त्यांच्यासोबत आलो. यावेळी मी फडणवीसांची भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवडीत त्यांनी मला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले,’ असं नांदगावकर यांनी सांगितलं.