• Mon. Nov 25th, 2024

    निवडणूक निरीक्षकांचा लोकसभा उमेदवार व प्रतिनिधींशी संवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 10, 2024
    निवडणूक निरीक्षकांचा लोकसभा उमेदवार व प्रतिनिधींशी संवाद

    नांदेड दि. १० : भारतीय निवडणूक आयोगासाठी सर्व उमेदवार समान आहे.उमेदवारांना असणारे स्वातंत्र्य, संरक्षण, विशेष अधिकाराचा वापर करा ,सोबतच भयमुक्त वातावरणात नि :पक्षपणे ही प्रक्रिया पार पडेल यासाठी आदर्श आचार संहितेचे पालन करा, असे आवाहन चारही निवडणूक निरीक्षकांनी आज लोकसभा उमेदवार व प्रतिनिधीशी संवाद साधताना केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीमध्ये उमेदवारांसोबत व त्यांच्या प्रतिनिधी सोबत सर्वसामान्य निरीक्षक शशांक मिश्र, पोलीस निरीक्षक जयंती आर. खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड, खर्च निरीक्षक मग्पेन भुटिया यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, खर्च कक्षाचे प्रमुख तथा महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी चारही निरीक्षकांनी सर्व बाबींवर मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने उमेदवारांकरीता भारत निवडणूक आयोगाने लागू केलेली निवडणूक आदर्श आचारसंहिताचे पालन करणे, निवडणूक लढविणारे पक्ष आणि उमेदवारी यांच्यामध्ये प्रत्येकाला यशस्वी होण्याची समान संधीची सुनिश्चिती करणे, निवडणूक प्रक्रियेतील पक्ष विचलित होणार नाहीत हे पाहण्यासाठी आदर्श आचारसंहिता लागू करणे, याबाबतची भूमिका समजावून सांगण्यात आली.

    निवडणूक काळामध्ये सर्वसाधारण आचरण कसे असावे, धार्मिक स्थळांचा, धार्मिक मुद्द्यांचा, जातीय मुद्द्यांचा वापर करण्यात येऊ नये,मतदारांना आमिष दाखवू नये, धाकदपटशा करू नये, मतदार केंद्रापासून शंभर मीटरच्या आत प्रचार करण्यावरचे निर्बंध, मतदारांना मतदान केंद्रावर निदान करण्यासाठी असलेला प्रतिबंध, सभा घेताना घ्यावयाची काळजी, मिरवणुकांच्या संदर्भातील वाहनांची संख्या,वाहनांवरील झेंडे, मिरवणुकीत शस्त्र न बाळगणे,विनापरवानगी कोणाच्याही घरावर झेंडे न लावणे, साडीवाटप, शर्ट वाटप, कपड्यांचा पूर्ण करण्यास परवानगी न देणे, विनापरवानगी रोड शोचे आयोजन करणे, निवडणूक कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणे, सत्ताधारी पक्षाने निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही सरकारी यंत्रणेचा चुकूनही वापर न करणे, सरकारी जनसंपर्क यंत्रणेचा गैरवापर करणे यंत्रणेला धाक दपटशा दाखवणे, आदींबाबत सावध राहण्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

    निवडणूक काळात कोणत्याही शासकीय वाहनाचा वापर करता येणार नाही, वाहनामध्ये वाहन चालकासह पाच पेक्षा अधिक व्यक्तींना फिरवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, सार्वजनिक मालमत्तेचे विरूपण व सार्वजनिक जागेचा दुरुपयोग याबाबतही सूचना करण्यात आल्या. तात्पुरते प्रचार कार्यालय उघडताना घ्यायची काळजी तसेच या काळातील उमेदवारांच्या खर्चाबाबतची नियमितता पाळणे खर्चाच्या बैठकीला उपस्थित राहणे, दैनंदिन खर्च दररोज सादर करणे याकडेही लक्ष वेधण्यात आले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed