• Sat. Sep 21st, 2024

रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदान जागृती स्तुत्य उपक्रम: जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

ByMH LIVE NEWS

Apr 9, 2024
रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदान जागृती स्तुत्य उपक्रम: जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

बीड दि.८ (जिमाका): रांगोळी ही भारतीय प्राचीन लोककला असून पांढऱ्या रांगोळीवर विविध रंगभरून सुंदर कलाकृती सादर करणे, हा विशेष गुण असून या माध्यमातून मतदान जागृती केली आहे हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या.

39 बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यात स्विपच्या माध्यमातून मतदान जागृती निमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. आज बीड शहरातील भाजी मंडई येथील संस्कार विद्यालयाच्या जुन्या इमारतीत स्वीप अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जिल्हादंडाधिकारी बोलत होत्या.

जिल्हादंडाधिकारी पुढे म्हणाल्या, रांगोळी हा कलाप्रकार भारतीयांचा अमूल्य ठेवा असून या अंतर्गत मुलींनी तसेच महिलांनी मतदान जागृतीसाठी याचा उपयोग करून आपल्या कलागुणांची सिद्धता केली आहे.

या ठिकाणी एकूण 43 रांगोळी असून 43 वेगवेगळ्या पद्धतीने मतदानाचा प्रचार प्रसार करण्याचे मोठे काम या महिलांनी केले असल्याचे भावना यावेळी जिल्हा दंडाधिकारी यांनी बोलून दाखविल्या. प्रत्येकांना पुरस्कार मिळणार नाही परंतु प्रत्येक रांगोळी ही मतदारांमध्ये जागृती नक्कीच पसरवेल असा विश्वास यावेळी जिल्हादंडाअधिकारी यांनी व्यक्त केला.

रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहा कापसे, द्वितीय क्रमांक विशाखा आगळे , राजश्री नलावडे, तृतीय क्रमांक स्वप्नाली रेंगे आणि श्रावणी गोरे यांनी पटकावला. पुरस्कार स्वरूप जिल्हादंडाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी,  सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी कविता जाधव, तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी,  गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, गट शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, शालेय पोषण अधीक्षक तुकाराम पवार, डॉ.विक्रम सारुक, विस्तार अधिकारी तुकाराम जाधव,सिद्धेश्वर माटे, श्रीमती  प्रणिता गंगाखेडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोठुळे यांनी केले तर आभार अनिरुद्ध सानप यांनी मानले.

परीक्षकांची जबाबदारी कैलास कलानिकेतनचे श्रीकांत दहिवाळ, बलभीम महाविद्यालयाचे प्राध्यापक केशव भागवत आणि शेषराव क्षिरसागर यांनी पार पाडली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शेख चाचू,ओम ढवळे, यांनी प्रयत्न केले.

०००

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed