काय घडलं?
भारत गेल्या दोन वर्षांपासून ते खडक पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. सध्या त्यांना लोहियानगर पोलिस चौकीच्या अंतर्गत रात्रपाळीवर सीआर मोबाइल मार्शलचे काम देण्यात आले होते, तसेच गस्तीसाठी कार्बाइन देण्यात आली होती. कर्तव्य बजावत असताना बरे वाटत नसल्याचे सांगून ते मध्यरात्री एकच्या सुमारास चौकीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या विश्रांती कक्षात गेले. आतून दरवाजा बंद करून ते झोपले. त्यानंतर त्यांनी कार्बाइनने डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कार्बाइनमधून चार फैरी झाल्याचे समजते.
ही घटना घडल्यानंतर तब्बल सहा-सात तास पोलिस अनभिज्ञ होते. चौकीचे काही कर्मचारी पहाटे चारच्या सुमारास आराम करण्यासाठी विश्रांती कक्षात गेले. परंतु, दरवाजा आतून बंद असल्याने चौकीत काम करणारी खासगी व्यक्ती झोपलेली असावाी, असे समजून त्यांनी लक्ष दिले नाही. अखेर भारत यांच्या पत्नीने सकाळी साडेअकराच्या सुमारास चौकशी केल्यावर तब्बल सहा-सात तासांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.