मुंबई : भाजप आणि शिवसेनेमधल्या (शिंदे गट) अंतर्गत संघर्षामुळे हिंगोलीतून जाहीर उमेदवार बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कोहळीकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. हेमंत पाटील यांच्याविरोधात हिंगोलीतून भाजप पदधिकाऱ्यांचा मोठा रोष होता. त्यामुळे भाजपच्या वाढत्या दबावानंतर थेटपणे कोहळीकर यांना एबी फॉर्म दिला जाणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे सलग पाच टर्म यवतमाळ वाशीम लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेल्या भावना गवळी यांचीही उमेदवारी कापली आहे. तिथून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे.हेमंत पाटील यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या यादीत जाहीर केली होती. गुरूवारी नामांकन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ते आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार होते. परंतु तेथील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी हेमंत पाटील यांचे काम करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर शिवसेनेच्या गोटात वेगाने चक्र फिरली. थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून उमेदवारी माघारी घ्यायला भाग पाडले, अशी माहिती आहे.
भावना ताईंना तिकीट द्या नाहीतर…..
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असतानाही महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. यावरून आक्रमक झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार भावना गवळी यांना मंगळवारी रात्रीपर्यंत उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा आम्ही राजीनामे देऊ,’ अशी भूमिका जाहीर घेतली होकी. त्यामुळे यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यांतील राजकीय वातावरण तापले आहे. बुधवारी सकाळपासून त्या मुंबईत एकनाथ शिंदे यांची मनधरणी करत होत्या.
महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपांच्या चर्चेचे घोडे अजूनही अडलेले
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येण्यास सुरुवात झाल्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपांच्या चर्चेचे घोडे अजूनही अडलेले आहे. महायुतीमध्ये सहा ते सात जागांसाठी रस्सीखेच आहे. तर, महाविकास आघाडीमध्येही काही जागांवरून चढाओढ सुरू आहे. त्यामुळे, उमेदवार ठरत नसल्यामुळे दोन्ही बाजूंसाठी ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती झाली आहे.