• Fri. Nov 29th, 2024
    अकोल्यात काँग्रेसकडून उमेदवार जाहीर, अभय पाटलांना तिकीट, तिरंगी लढत होणार

    मुंबई : अकोला लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने डॉ अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन दिवस उरले असताना काँग्रेसने अभय पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. भाजपने खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करून सरशी केली. त्यामुळे अकोल्याची लढत आता तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला राज्यात सात जागांवर पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, ते स्वत: अकोल्यात लढत असल्याने काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देईल, अशी चर्चा होती. या मतदारसंघात प्रत्येक वेळी काँग्रेस आणि वंचितमध्ये मतविभाजन होऊन भाजपचा विजय झाला. मागील चार निवडणुकांमध्ये हाच अनुभव असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी एकत्र लढणार, असे मानले जात होते. परंतु इथे काँग्रेसने उमेदवार देऊन अकोल्यात तिरंगी लढत केली आहे.

    मराठा समाजाच्या भूमिकेकडे लक्ष

    प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पाटील यांचे पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना समर्थन असल्याचे सांगितले होते. हे लक्षात घेता अकोला लोकसभा मतदारसंघातील मराठा मतांचे विभाजन होण्याचा धोका व्यक्त होतोय. मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने अकोल्यात समाज एकवटला होता. हा समाज निवडणुकीत कुणाला पाठिंबा देतो यावरही बरेच अवलंबून आहे.

    ठाकरे गटाने काँग्रेसला जागा सोडली

    महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अकोला लोकसभा मतदारसंघावरील आपला दावा सोडला आहे. या मतदारसंघावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेली रस्सीखेच थांबली आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून तयारी केली जात आहे. उमेदवारीची आस मनात ठेवून दोन वर्षांपासून डॉ. अभय पाटील मतदारसंघात काम करीत आहेत. मागील निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजप सोबत होते. खासदार संजय धोत्रे यांच्या मताधिक्क्यात शिवसेनेच्या मतांचा वाटा अधिक होता. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या रूपाने काँग्रेससोबत आहे. हे एकीचे बळ मोडीत काढण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed