• Sun. Mar 15th, 2026

    बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढत: सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा

    बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढत: सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा

    बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. शरद पवार गटाकडून पाच मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले यात बारामती मतदारसंघाचा समावेश आहे. सुप्रिया सुळे बारामतीतून तिसऱ्यांदा निवडणूक लढवतील. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाल्याच्या काही मिनिटातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली.

    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. अजित पवार महायुती आल्यापासून लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याची चर्चा होती. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढणार हे स्पष्ट झाले होते. आज या लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
    शरद पवार यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर; ५ उमेदवारांमध्ये सुप्रिया सुळे, कोल्हे आणि निलेश लंकेंचा समावेश

    शरद पवार गटाकडून आज शनिवारी लोकसभेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात दिंडोरी, वर्धा, शिरुर,अहमदनगर दक्षिण आणि बारामती मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर एका तासाच्या आत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

    पवार विरुद्ध पवार

    बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आज महायुतीच्या माध्यमातून मला बारातमती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. या उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील महायुतीच्या सर्व नेत्याचे आभार मानले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed