• Tue. Mar 17th, 2026

    दुर्गम, आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करा – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 17, 2026
    दुर्गम, आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करा – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई दि.१७ : डहाणू, पालघर जिल्ह्यातील, विशेषतः दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

    उपजिल्हा रुग्णालय डहाणू पालघर येथील विविध समस्या व नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चित्रा वाघ, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्यसेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर, शल्यचिकित्सक तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले की जनसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासनाला युद्धपातळीवर कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आदिवासीबहुल क्षेत्रातील मासवण, दुर्वेश आणि धुंडलवाडी येथील रुग्णालयांच्या इमारतींचे बांधकाम, खाटांची उपलब्धता आणि प्रसूती कक्षांमधील सोयीसुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. विशेषतः सफाळे, दुर्वेश, सोमटा आणि दांडी यांसारख्या महत्वाच्या केंद्रांवरील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी पावले उचलली जातील. ज्या ठिकाणी सोनोग्राफी मशीन्स किंवा ऑक्सिजन प्लांट यंत्रणा त्वरित कार्यान्वित करून तिथे रेडिओलॉजिस्टची नियुक्ती करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

    रुग्णांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवेचे व्यवस्थापन अधिक चोख करण्यावर भर दिला असून, कामचुकार करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, तलासरी ग्रामीण रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवणे, जनरेटरची सोय करणे आणि डॉक्टरांना कर्तव्यावर असताना ॲप्रन अनिवार्य करणे यांसारख्या शिस्तबद्ध बदलांचा यात समावेश आहे. आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित करण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित असलेली सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याबाबतच्या सूचना मंत्री  आबिटकर यांनी यावेळी दिल्या.

    पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी तातडीने अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. विशेषतः आदिवासी बहुल क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. पालघरमधील शेवटच्या टोकापर्यंत ही आरोग्य सेवा सक्षमपणे पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

    ०००

    दत्तात्रय कोकरे/वि.सं.अ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed