• Sat. Sep 21st, 2024

होरपळ थांबेना! सिटीलिंकच्या संपामुळे नाशिककरांची गैरसोय; वेतनाअभावी वाहकही अडचणीत

होरपळ थांबेना! सिटीलिंकच्या संपामुळे नाशिककरांची गैरसोय; वेतनाअभावी वाहकही अडचणीत

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी : तपोवनातील सिटीलिंक बसडेपोतील सुमारे साडेपाचशे वाहकांनी विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून काम बंद केले आहे. यामुळे सिटीलिंक बससेवा विस्कळीत झाली आहे. वेळेवर वेतन होत नसल्याने वाहकांना विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ येत आहे. संप केल्यानंतर प्रत्येकवेळी ठेकेदारांकडून मिळणारी आश्वासनेही पूर्ण केली जात नाहीत. त्यामुळे वाहकांना आर्थिक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. घरभाडे भरणे शक्य होत नाही. पाल्यांचे शिक्षण शुल्क भरणे मुश्किल होत आहे. ऐनवेळी येणाऱ्या आजारपणाच्या काळात समस्या आणखी गंभीर होत असल्याने सांगा आम्ही जगायच कसं? असा प्रश्न केला जात आहे.तपोवनातील सिटीलिंक बसडेपोत १५० बसेस असून, त्या तीन शिफ्टमध्ये शहराच्या विविध भागात फेऱ्या मारतात. त्यासाठी सुमारे साडेपाचशे वाहक कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे वाहक या बससेवेत आहेत. या काळात ही सेवा देत असणाऱ्या वाहकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यांच्याकडून वारंवार संप पुकारला जात आहे. या अगोदर सातवेळा बंद करून त्यांच्या मागण्यापूर्ण झालेल्या नाहीत. सध्या पाच दिवसांपासून ही बससेवा ठप्प आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद होऊन त्याचा त्रास विद्यार्थी, कामगार व प्रवाशांना होत आहे.

बहुतांशी वाहक हे आदिवासी पाड्यावरून आलेले आहेत. त्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने घरभाडे भरता येत नाही. त्यामुळे कित्येकांना घरमालकांनी बाहेर काढले आहे. त्यात महिला वाहकांचीही संख्या मोठी आहे. काही महिला वाहकांना तर मंदिराच्या परिसरात रात्र काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्या थेट आदिवासी पाड्यावर बसडेपोपर्यंत रोज ये-जा करीत आहेत. अशा परिस्थितीत वेतन मिळत नसल्याने आम्ही जगायच कसं? असा प्रश्न त्यांच्याकडून केला जात आहे.

वाहक म्हणतात… कामबंदची हौस नाही!

वेतनाअभावी वाहकांना कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पाडताना मोठी कसरत करावी लागत आहे. मागण्यांसाठी वारंवार बंद पुकारण्याची आम्हाला हौस नाही. मात्र, आमच्याही परिस्थितीचा विचार करावा असे त्यांचे म्हणणे आहे. पाल्यांची फी भरली जात नसल्याने शाळांकडून विद्यार्थ्यांना घरी बसविण्याच्या सूचना केला जात आहेत. घरभाडे कसे भरायचे हा प्रश्न दर महिन्यात सतावत आहे. सर्वच वाहकांचे थकीत वेतन मिळत नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचा निर्धार या वाहकांनी केला आहे.
बारामती आगारातील बस खिळखिळ्या; ब्रेकसाठी लावली वीट, तर काचेला बाटलीचा आधार
विधानसभा उपाध्यक्षांना साकडे

तपोवनातील डेपोच्या वाहकांनी सोमवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. आंदोलनावेळी आश्वासन दिल्याने कामबंद आंदोलन मागे घेऊनही मागण्या पूर्ण केल्या जात नसल्याची या वाहकांची तक्रार आहे.

…या आहेत मागण्या

– वाहकांना मागील दोन-तीन महिन्यांचे तसेच मागील वर्षाचे थकीत वेतन देण्यात यावे
– मागील वर्षाचा थकीत बोनस, वर्क ऑफ लिव्हचे थकीत पैसे, वाहकांचा थकविम्यात आलेल्या पीएफ व इएसआय देण्यात यावा
– वाहकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्यात यावे
– मागण्यांसाठी जे काही संप झाले, त्याचा कुठल्या प्रकारचा दंड लागू करण्यात येऊ नये
– वाहकांचा तीन वर्षांच्या वेतनाचा फरक मिळाला पाहिजे
– येणारे नवीन वेतन हे वाढीव दराने मिळाले पाहिजे
– वाहकांना देण्यात येणाऱ्या युनिफार्म हा कंपनीकडून मिळाला पाहिजे, वाहकांकडून पैसे घेण्यात येऊ नये
– वाहकांकडून चुकीच्या प्रकारचे दंड वसूल करण्यात येऊ नये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed