कोण आहेत आमश्या पाडवी?
नंदूरबारमधील ठाकरेंचे विश्वासू शिलेदार अशी पाडवी यांची ओळख आहे. १९९५ पासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. कोवली विहीर गावचे सरपंच म्हणून ते निवडून आले. अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापतीपद त्यांनी दोनदा भूषवलं. २० वर्षे ते पंचायत समिती सदस्य होते. अकरा वर्षांपासून ते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आदिवासींच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आहेत. वेळोवेळी मोर्चे, आंदोलन करत आहेत.
२०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्याकडे जिल्हाप्रमुखपद देण्यात आलं. त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली. पण दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला. पण आक्रमक आदिवासी चेहरा असल्यानं ठाकरेंनी त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यासाठी ठाकरेंनी अनेक बड्या नेत्यांना बाजूला सारलं. २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.
आमश्या पाडवींनी २०१४ मध्ये अक्कलकुला मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी ते मतदारसंघात चौथ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेस नेते के. सी. पाडवींनी निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये आमश्या पाडवींनी के. सी. पाडवींसमोर आव्हान उभं केलं. त्यांनी ८० हजारांहून अधिक मतं घेतली. पण के. सी. पाडवींनी केवळ २ हजारांच्या फरकानं विजय मिळवला. पण ठाकरेंनी पाडवींना आमदार केलं. त्यांना विधान परिषदेवर निवडून आणलं.
