• Fri. Nov 29th, 2024

    निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

    ByMH LIVE NEWS

    Mar 17, 2024
    निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

    छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून  त्यानुसार चवथ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत विश्वास व्यक्त केला.

    निवडणूका जाहीर होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या निवडणूक सज्जतेची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे  तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

    या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी स्वामी यांनी निवडणूकीविषयक सर्व माहिती दिली.

    निवडणूक कार्यक्रमः

    निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यात चवथ्या टप्प्यात निवडणूक होत आहे.

    निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे- 

    १.      अधिसूचना जारी करणे- गुरुवार दि.१८ एप्रिल,

    २.      नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक  गुरुवार दि.२५ एप्रिल,

    ३.      नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार दि.२६ एप्रिल,

    ४.    उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिनांक सोमवार दि.२९ एप्रिल,

    ५.     मतदानाचा दिनांक सोमवार दि.१३ मे,

    ६.      मतमोजणीचा दिनांक मंगळवार दि.४ जून,

    ७.     निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक गुरुवार दि.६ जून.

    मतदार संघ व मतदान केंद्रांची रचनाः-

    जिल्ह्यात १८ जालना आणि १९ औरंगाबाद अशा दोन लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.  त्यात जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण हे विधानसभा मतदारसंघ क्षेत्र जालना लोकसभा मतदार संघास जोडलेले असून औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड हे विधानसभा मतदार संघ क्षेत्र औरंगाबाद लोकसभा मतदार संघास जोडलेले आहेत.  त्यात जालना लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या क्षेत्रासाठी १०४५ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या क्षेत्रासाठी २०४० असे एकूण ३०८५ मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

    २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३७ लक्ष १ हजार २८२ इतकी असून  सन २०२४ ची अनुमानित लोकसंख्या ४५ लक्ष ८९ हजार ३२२ इतकी आहे.

    या लोकसभा मतदार संघासाठी  जालना लोकसभा मतदार संघासाठी ९ लाख ९७ हजार ५२३ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी  २० लाख ३५ हजार ०२३ असे एकूण ३० लाख ३२ हजार ५४६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

    वयोगटानुसार मतदारः-

    वयवर्षे १८ ते १९ या वयोगटातील म्हणजेच नवमतदारांची संख्या ही ४१४६५, २० ते २९ वर्षे वयोगटातील-६२३४९१, ३०-३९ वयोगटातील -७५५६११, ४०-४९ वयोगटातील-६३३०५८, ५०-५९ वयोगटातील-४६८००७, ६०-६९ वयोगटातील२७५००१, ७०-७९ वयोगटातील-१५१४७४ तर ८० व त्यापेक्षा अधिक वयोगटातील -८४४३९ असे एकूण ३० लाख ३२ हजार ५४६ मतदार आहेत.

    मतदारांसाठी मतदान केंद्रावर सुविधाः-

    जिल्ह्यात ४५ मतदान केंद्र हे मॉडेल मतदान केंद्र म्हणून बनविण्यात येणार आहे.  मतदान केंद्रांवर आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. त्यांचीही सज्जता झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहायता कक्ष, लहान बालकांसाठी पाळणा घर, सावलीची सुविधा, पिण्याचे पाणी, औषधोपचार कक्ष, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी आवश्यकतेनुसार व्हिल चेअर सुविधा, दिशादर्शक फलक इ. सुविधा देण्यात येणार आहात. तसेच मतदान केंद्रस्तरीय मतदार जागरुकता गट बनविण्यात येणार असून जिल्ह्यात असे २८९८ गट बनविण्यात आले असून त्याद्वारे मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती केली जाणार आहे.

    ‘स्वीप’द्वारे मतदार जनजागृतीः-

    जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी विविध माध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे, त्यांचे मतदार यादीतील नाव सापडणे, त्यांचे मतदान केंद्र नेमके कुठे आहे याबाबतही त्यांच्यासाठी सर्व माहिती देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावरही मतदार सुविधा केंद्र निर्माण केले जाणार आहेत,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

    आचारसंहिता अंमलबजावणीः-

    निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांकडे असलेली शासकीय वाहने जमा करण्यात आले असून शासकीय, सार्वजनिक इमारतींवरील राजकीय पक्षांचे बॅनर्स, होर्डिंग्ज,झेंडे आदी सामुग्री जमा करण्यात येत आहे. त्यासाठी स्थिर सर्व्हेक्षण पथके, फिरते सर्व्हेक्षण पथके, व्हिडिओ सर्व्हेक्षण पथके, व्हिडिओ पाहणी पथके आदी नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यान्वयन सुरु झाले आहे,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले आहे. जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक सहा. निवडणूक निर्णय अधिकारीस्तरावर १९५० हा टोल फ्री क्रमांकही कार्यान्वयीत करण्यात आला आहे.  तसेच निवडणूक आयोगाच्या विविध ॲप द्वारेही मतदारांना विविध प्रकारची माहिती मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आचार संहिता लागू होताच जिल्ह्यातील प्रत्येक प्रिंटींग प्रेसला त्यांच्याकडे छापला जाणाऱ्या प्रत्येक कामाची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक  असल्याचेही सांगण्यात आले. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने  परवानाधारकांना त्यांचे शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियमाचीही अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सांगितले.

    ‘फेक न्यूज’वर विशेष लक्ष

    जाणीवपूर्वक खोटी, बनावट माहिती, व्हिडीओ, फोटो, मजकुर सोशल मिडियाद्वारे पसरवणे, जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक जातीय तेढ निर्माण करणे याबाबतचे प्रयत्न रोखण्यासाठी व त्यावर कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करुन नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सोशल मिडीयावरील पोस्ट इ. ची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. तसेच व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनने अशा माहितीच्या प्रसाराबाबत खातरजमा केली पाहिजे. त्यातून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप ॲडमिनलाही जबाबदार धरले जाईल असे त्यांनी सांगितले.

    माहिती तंत्रज्ञानाचा वापरः-

    यंदाच्या लोकसभा निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यात येणार असून जवळपास १५ ॲप च्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदार, उमेदवार, अधिकारी, निरीक्षक अशा सर्व घटकांना या ॲपचा आपले कामकाज जलद व अचूक करणे, मतदारांना सुविधा उपलब्ध होणे, आचारसंहिता भंगाकडे लक्ष ठेवून त्याची दखल घेणे, तक्रारी नोंदविणे, कारवाई करणे अशा विविध बाबी या ॲपमुळे मोबाईलद्वारे सहज करता येणार आहेत,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

    कायदा सुव्यवस्थेसाठी सज्जता- पोलीस आयुक्त लोहिया

    निवडणूक काळात जिल्ह्यात पोलीस आयुक्त हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व निर्भयतेचे वातावरण राखण्यासाठी पोलीस दलाची सज्जता असून त्यासाठी मतदान केंद्रनिहाय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे.  जिल्ह्यात अतिरिक्त बंदोबस्तासाठी राज्यराखीव दलाच्या तीन तुकड्या तर केंद्रीय राखीव दलाच्या  दोन तुकड्या प्राप्त होणार आहेत. तसेच संवेदनशील व जोखमीच्या मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

    आचारसंहिता भंगाची तात्काळ दखल घेणार-विकास मीना

    जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची तात्काळ दखल घेण्याची यंत्रणा सज्ज करण्यात आली असून १९५० टोल फ्रि क्रमांक, ९४ स्थिर सर्व्हेक्षण पथके, तसेच फिरते सर्व्हेक्षण पथके  इ. माध्यमांतून ग्रामिण भागापासून शहरी भागापर्यंत प्रशासनाचे लक्ष आहे.  त्यासाठी नागरीकही सी व्हिजील या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतात, असे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

    ०००००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed