• Wed. Mar 18th, 2026

    भाजपकडून दबाव वाढला, शिंदे हातकणंगलेत उमेदवार बदलणार? विश्वासू शिलेदाराचं नाव चर्चेत

    भाजपकडून दबाव वाढला, शिंदे हातकणंगलेत उमेदवार बदलणार? विश्वासू शिलेदाराचं नाव चर्चेत

    कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या ६ विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्याच्या सूचना केल्या आहेत. यात हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचाही समावेश आहे. माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे. त्यांना तिकीट दिल्यास हातकणंगलेची जागा धोक्यात येईल, असं शिंदेंना भाजपकडून सांगण्यात आलं आहे. त्यासाठी भाजपकडून त्यांनी केलेल्या सर्व्हेंचा हवाला देण्यात आला.

    महायुतीकडून हातकणंगलेत सरप्राईज उमेदवार दिला जाऊ शकतो. कोल्हापूरच्या शिरोळ आमदार आणि माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या नावाची हातकणंगलेसाठी चर्चा आहे. मतदारसंघातील जातीय समीकरणं पाहता उमेदवारीसाठी यड्रावकर यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्यांचं नाव अचानक चर्चेत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
    भाजपची अट, शिंदेसेनेच्या ६ खासदारांचा पत्ता कट? सर्व्हेमुळे अमित शहा टेचात, CM पेचात
    अपक्ष आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यांनी ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. त्यांना राज्यमंत्रिपदही देण्यात आलं. यानंतर सेनेत झालेल्या बंडानंतर त्यांनी शिंदेंना साथ दिली. त्यांचे बंधू संजय पाटील मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्या नावाची चर्चा हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सुरू आहे.

    हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने शिंदे गटात आहेत. पण त्यांच्याविरोधात जनतेत नाराजी असल्यानं उमेदवार बदला, अशी मागणी भाजपनं केली. शिंदे यांचा मानेंनाच उमेदवारी देण्याचा मानस होता. पण भाजपनं इथून जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरेंचं नाव पुढे केलं. पण आता शिंदेसेनेकडून संजय पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यासाठी शिंदे प्रयत्न करताना दिसत आहेत.
    महायुतीत ६ जागांमुळे जोरदार घमासान; तिन्ही पक्ष इरेला पेटले, कोणाचे कोणत्या जागांवर दावे?
    महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी फिक्स?
    महाविकास आघाडीचं जागावाटपही रखडलेलं आहे. पण हातकणंगलेची जागा मविआकडून राजू शेट्टीच लढवणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मागील निवडणुकीत धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला होता. त्यामुळे माने जायंट किलर ठरले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed