काय आहे प्रकरण?
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास दोंडके (रा. भैरवनाथ नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी एकत्रित कुटुंबात राहतात. घरात लग्न सोहळा असल्याने त्यांनी नातलगांसह मित्रांकडून काही रक्कम घेतली होती. सदर पैसे घरातील लाकडी कपाटात ठेवलेले होते. हे पैसे संशयित महाराज व त्यांच्या साथीदाराने लंपास केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, पैसे घेऊन महाराज व साथीदार पसार झाल्यावर फिर्यादींनी सतत संपर्क साधला. मात्र, महाराजाने फोन न उचलल्याने त्यांनीच २१ लाख रुपये चोरल्याचा संशय फिर्यादींना आला. त्यानुसार त्यांनी फिर्याद दिल्याने नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
सात हजारांचा ‘प्रसाद’
फिर्यादी हे नोव्हेंबर २०२३ मध्ये देवदर्शनाकरीता आळंदीत गेले होते. त्यावेळी महाराजांसोबत त्यांची ओळख झाली. आळंदीच्या मंदिरात महाराजांनी प्रसाद स्वरुपात फिर्यादींना दोन हजार रुपये दिले. डिसेंबर २०२३ मध्ये महाराज व सहकारी नाशिकमध्ये आले. पंचवटीत फिर्यादी त्यांना भेटले. त्यावेळी पुन्हा महाराजाने पाच हजार रुपये ‘प्रसाद’ म्हणून दिले होते. त्यामुळे फिर्यादी व महाराज यांच्यातील जवळीक वाढली होती.
…अन् साधली संधी
९ मार्च रोजी नाशिकमध्ये येत असून, रिक्षातून त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाऊ, त्यानंतर घरी येत मुलीला आशीर्वाद देईन, असे संशयित महाराजाने फिर्यादींना सांगितले. ९ मार्चला एका नातलगाचे निधन झाल्याने फिर्यादींनी कुटुंबीयांना मनमाड येथे जाण्यासाठी सायंकाळी चार वाजता रेल्वे स्टेशनवर सोडले. सायंकाळी पाच वाजता महाराज व त्यांचा साथीदार नाशिकमध्ये आल्यावर फिर्यादीसह त्र्यंबकेश्वरला गेले. तेथून रात्री पावणे नऊ वाजता फिर्यादीच्या घरी पोहोचले. ‘आम्ही अंघोळ करतो, तोपर्यंत नारळ व दूध पिशवी आणा’, असे महाराजाने फिर्यादीला सांगितले. फिर्यादी घराबाहेर गेल्याची संधी साधत लाकडी कपाटातून २१ लाख रुपये घेत महाराज व त्यांचा साथीदार पसार झाला. फिर्यादी घरी आल्यावर दोघेही दिसले नाहीत. तर कपाटातील पैसेही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले, असे फिर्यादीत नमूद आहे.