• Mon. Nov 25th, 2024
    जोपर्यंत मेंदू चालतोय तोपर्यंत नव्या पिढीला मार्गदर्शन करायचं सोडायचं नाही : शरद पवार

    दीपक पडकर, बारामती : वय वाढले हे ठीक आहे परंतु आपण जेष्ठत्वाकडे झुकलो तेव्हा कदाचित आपले पाय दुखतील, गुडघे दुखतील, दात दुखतील परंतु त्याचा आपल्या डोक्यावर परिणाम होत नाही, म्हणजेच मेंदूवर परिणाम होत नाही. हा मेंदू जोपर्यंत सशक्त आहे तोपर्यंत आपल्याला वय वाढण्याचे, चिंता करण्याचे कारण नाही, अशी फटकेबाजी खुद्द बारामतीत करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. जेष्ठ नागरिक हे समाजाचा ठेवा आहेत. तो ठेवा असाच जपण्याची गरज आहे, असे भावनिक मतही त्यांनी व्यक्त केले.

    निमित्त होते, बारामतीतील ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे… अनौपचारिक गप्पांसाठी शरद पवार आले होते. त्यांच्या आगमनाप्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या नावाचा गजर करून त्यांना पाठिंबा दर्शवला. ज्येष्ठ नागरिकांची संख्या या कार्यक्रमाला बरीच होती.

    या कार्यक्रमात शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पवार म्हणाले, आता ज्येष्ठांच्या ओळीत मी पण बसतो. कारण आता माझं वय देखील ८४ झालं आहे. जेष्ठ नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत. ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वर्ग असून देशाच्या उभारणीत त्यांचाही मोठा वाटा आहे. नव्या पिढीला ज्ञान देणारे घटक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते.

    “एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, जेव्हा मी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा आपण धान्य आयात करत होतो आणि जेव्हा मंत्रिपद सोडलं तेव्हा आपण जगातल्या अकरा देशांना धान्य निर्यात करत होतो. आपल्याकडे आधी कापसाच्या जिनिंग मिल होत्या. तसेच अनेक गुऱ्हाळे होती. त्यानंतर जाचक, घोलप आणि माझे वडील तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर सोमेश्वर कारखाना मुकुटराव काकडे यांनी स्थापन केला. त्यानंतर माळेगाव कारखाना सुरू झाला आणि या दरम्यानच्या काळामध्ये येथील गुऱ्हाळे गेली आणि कारखानदारी वाढीस लागली. इथून सगळे परिस्थिती बदलायला लागली फक्त परिस्थितीच बदलली नाही तर नागरिकांची क्रयशक्ती देखील वाढली”.
    साहेबांमुळे आपली ओळख, नातवाकडून आजोबांचं तोंडभरुन कौतुक, युगेंद्र यांच्यामुळे पवार गटाला ताकद मिळणार

    हा बदल होत असतानाच त्याचा पूर्ण टप्पा शिक्षणाकडे वळला. सुरुवातीला फक्त एम.ई.एस संस्थेची शाखा होती. त्यानंतरच्या काळामध्ये विद्या प्रतिष्ठान शारदानगरचे कृषी विकास प्रतिष्ठान, त्यानंतर माळेगावची इंजिनिअरिंग कॉलेज, सोमेश्वरचे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले आणि शिक्षणाने परिस्थिती बदलली. पुण्यानंतर ज्ञानाचे केंद्र बारामती झाले. त्यानंतर आपण येथे एमआयडीसी सुरू केली. प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी सुरू झाले.
    अनुभवी नेत्यावर खालच्या भाषेत बोलता लोकं हे सहन करणार नाही, रोहित पवारांनी सुनील शेळकेंना सुनावलं

    “एक मात्र खरंय की हा काळ असा होता की समोर कोणीही आले तर त्याचे नाव माहिती असायची. आता 75 टक्के लोक ओळखू येत नाहीत. कारण अनेक लोक इथे बाहेरून आले, त्यांनी बारामतीला आपले मानले आणि बारामतीचा लौकिक वाढवला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बारामतीचे योगदान मोठे आहे. माझा जन्म झाला तेव्हा स्वातंत्र्यलढा सुरू होता. माझं स्वातंत्र्य लढ्यात काही योगदान नाही पण त्या लढ्यात योगदान दिलेली खूप मोठी माणसे बारामतीची आहेत”.

    पुढचे ४५ दिवस जीवाचं रान करा साहेबांसाठी, सर्वांनी कष्ट करा, तुतारी चिन्हांचा प्रचार करा : युगेंद्र पवार

    बारामती मोरोपंतांची, श्रीधर स्वामींची… मोरोपंतांनी विपुल लेखन केले, केकावली लिहिली. श्रीधर स्वामींनी इथल्याच कसब्यातल्या मंदिरात शिवलीलामृत ग्रंथ लिहिला, असं बारामतीचं योगदान खूप मोठं आहे. हे मोठे योगदान आपण नव्या पिढीला शिकवलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

    सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, खासदार सुळेंची पहिली प्रतिक्रिया

    वय वाढले जरूर त्याचे परिणाम होतील, पाय दुखतील इतर व्याधी होतील. दात दुखतील. दाताच्या जागेवरती कवळी येईल. परंतु असं असलं तरी त्याचा आपल्या मेंदूवर मात्र परिणाम होणार नाही. मेंदू आपला सशक्त आहे तोपर्यंत आपण ज्ञान वाटायचे काम करूयात. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा आहे. तो जपला पाहिजे नाही आणि नव्या पिढीला मार्गदर्शन करायचं सोडायचं नाही, असंही पवार म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *