• Sat. Sep 21st, 2024

वडगावच्या विकासासंबंधीचे इतर सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ByMH LIVE NEWS

Mar 8, 2024
वडगावच्या विकासासंबंधीचे इतर सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर दि. (जिमाका) : वडगाव  नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटीचा निधी देण्यात आला आहे. शिवराज्य भवन बांधकामासाठी १ कोटी ५० लाख निधी दिला आहे. या वास्तूंसाठी आणखी निधी लागणार असून तोही दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे करीत असताना याठिकाणी भव्य वास्तू उभाकरुन त्यामधून सर्वसामान्यांच्या कामांना न्याय देण्याचे काम करा. वडगावच्या विकासासंबंधीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक निधीही दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वडगाव नगरपरिषद नविन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे पहिला टप्पा भूमिपूजन, भूमिनंदन कॉलनी येथे शिवराज्य भवन बांधणे पहिला टप्पा भूमिपूजन व वडगाव सराफ व्यापारी नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना सुवर्ण मुद्रा वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार धैयशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार राजू आवळे, आमदार डॉ. विनय कोरे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पेठवडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पेठवडगाव रिंग रोडचा प्रश्न मार्गी लावला जाईल. वडगावनगरीचा डिपी प्लान नगरपालिकेने केला आहे तो हद्दवाढ झाल्यानंतर पुर्नस्थापित करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेवून, कोणावरही अन्याय होणार नाही असा करण्यात येईल, तोपर्यंत या डिपी प्लॅनला स्थगिती देवू असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला. यामुळे राज्यातील 4 कोटी लोकांना विविध योजनांचा लाभ मिळाला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये एस.टीच्या प्रवासात 50 टक्के सवलत दिली. लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली. शेतकऱ्यांना पुर्वी एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत दिला जात होती. यामध्ये बदल करुन ही मदत दुप्पट केली आहे. दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टर केली आहे. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शासन देत आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकार 6 हजार रुपये देते त्याबरोबर आता राज्य शासनही ६ हजार रुपये देत आहे. त्यामुळे वर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. १ रुपयामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येतो. प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यातील गडकोट किल्ले, मंदिरे यांच्या जतनासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी खासदार धैर्यशील माने यांनीही पेठवडगाव शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती देवून या नगरीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध कामांची मागणी केली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed