• Sat. Nov 16th, 2024

    जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे १२ मार्चपासून वार्षिक प्रदर्शन

    ByMH LIVE NEWS

    Mar 7, 2024
    जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे १२ मार्चपासून वार्षिक प्रदर्शन

    मुंबई, दि. ७ : सर ज.जी. कला महाविद्यालय ही दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य कला संस्था असून २ मार्च रोजी या संस्थेने १६८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेचा वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन ११ मार्च रोजी सायं. ५ वा. होणार आहे.  दि. १२ ते १७ मार्च या कालावधीत सकाळी १०.३० ते सायं. ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्व कलाप्रेमींना विनामूल्य पाहता येईल.

    वार्षिक कला प्रदर्शन हा विद्यार्थी व संस्थेसाठी महत्त्वाचा उपक्रम असून यामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्ट कलाकृती निवडून त्या प्रदर्शित केल्या जातात.

    सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या मुख्य इमारतीतील तळमजला तसेच पहिला मजला व रे आर्ट वर्कशॉप या इमारतीमध्ये हे संपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व लेखिका डॉ. फिरोजा गोदरेज व संस्थेचे माजी विद्यार्थी व चित्रकार विलास शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. दि. १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅशन शोचे आयोजन, दि.१३ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वा प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रुती सडोलीकर यांच्या हिंदुस्थानी शास्रीय संगीत गायनाच्या कार्यक्रमास सर्वाना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. दि. १६ मार्च रोजी कलावेध चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.

    या प्रदर्शनामध्ये चित्रकला विभागातील विद्यार्थ्यांनी वास्तववादी पद्धतीने रंगवलेली व्यक्तिचित्र निसर्ग चित्र, स्थिर चित्र प्रदर्शित केली आहेत त्याच बरोबर प्रिंट मेकिंग व रचनाचित्र या विषयांमध्ये वेगवेगळे सामाजिक विषय तसेच व्यक्तिगत अनुभवावर आधारित विविध पद्धतीने चित्र रंगविलेली आहेत.

    शिल्पकला विभागामध्ये व्यक्ती शिल्प व रचना शिल्प ही फायबर, लाकूड, वेगवेगळ्या प्रकारचे दगड व मिश्र माध्यमांचा वापर करून शिल्पाकृती बनविलेल्या आहेत धातू काम विभागातील विद्यार्थ्यांनी तांब्याचा पत्रा, विविध पद्धतीने ठोकून व वेगवेगळे उठाव निर्माण करून विविध कलाकृती तयार केल्या आहेत.

    इंटेरियरच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फर्निचर व इंटेरियरची डिझाईन तयार करून त्यांची मॉडेल या प्रदर्शनामध्ये सादर केली आहेत. टेक्स्टाईल या विभागातील विद्यार्थ्यांनी विव्हिंग व प्रिंटिंग पद्धतीने कार्पेट, बेडशीट, पडदे, साडी, ड्रेस इत्यादी वर नावीन्यपूर्ण डिझाईन केलेली पहावयास मिळतील याचबरोबर कलाशिक्षक प्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचीही कामे यात प्रदर्शित करण्यात आली आहेत.

    कला रसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे तसेच चित्रकला व डिझाईनच्या क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी योग्य क्षेत्र निवडण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरेल.

    ०००

    श्रद्धा मेश्राम/स.सं

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed