धुळे, दिनांक 7 मार्च, 2024 (जिमाका वृत्त): आदिवासी विकास विभागाच्यावतीने आगामी काळात राज्यात मागेल त्याला घरकुल देण्याचा मानस असून एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
शिरपूर येथे धुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात डॉ. गावित बोलत होते. खासदार डॉ. हिना गावित, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, पंचायत समिती सभापती लताताई पावरा, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, गट विकास अधिकारी श्री.सोनवणे, माजी जि.प.अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावीत म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या वतीने येत्या दोन वर्षांत राज्यातील एकही पात्र आदिवासी कुटूंब घरापासून वंचित राहणार नाही. यासाठी येत्या काळात 2 लाख आदिवासी बांधवांना 100 टक्के घरे देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी 96 हजार घरकुलांना मंजूरी दिली तर यावर्षी 1 लाख 25 हजार घरकुलांना मंजूरी दिली आहे. यापुर्वी गावात घरकुल बांधण्यासाठी जागेसाठी 50 हजार अनुदान दिले जात होते. आता 1 लाख रुपये दिले जात आहे. राज्य सरकारने नवीन घरकुल बांधण्यासाठी रुपये 3 लाखापर्यंत रक्कमेसाठी मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे सर्व घरकुल योजनेची किंमत सारखीच करण्याचे धोरण सरकारचे असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या जून महिन्यापर्यंत सर्व पाडे, गावे, आश्रमशाळा, वसतीगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या, शाळा, ज्या ठिकाणी रस्ते नाही तेथे 100 टक्के बारमाही रस्ते तयार करण्यात येईल. रस्त्यासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. तसेच सर्व वाड्या वस्तीमध्ये 100 टक्के विद्युत व सबस्टेशन देणार आहे. या भागातील 95 टक्के लोकांकडे शेती आहे. त्यांना नवीन योजना तयार करणार असून त्यात शेतीसाठी अवजारे बॅक, सोसायटी, वनधन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तसेच शेती बरोबरच जोडधंद्यासाठी 2 हजार नागरिकांना शेळी, कोंबडी गायी देणार आहे. तसेच भजनी मंडळांना साहित्य, युवकांना क्रिकेट साहित्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागात सांस्कृतिक भवन, वाचनालय, आश्रमशाळेत शिक्षकांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार डॉ.हिना गावित म्हणाल्या की, शिरपुर तालुक्यातील अनेकांनी माझ्याकडे घरकुल योजनेची मागणी केली होती. त्यानुसार प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले आहे. घरकुल देत असतांना 2011 च्या जनगणनेप्रमाणे ज्यांच्याकडे घरकुल नाही अशा सर्वांना घरकुले दिलीत. तसेच 2011 च्या जनगणेत ज्यांची नावे यादीत आली नाहीत अशासाठी ‘ड’ याद्या तयार करुन केंद्र शासनाला पाठविल्यात. ही ‘ड’ यादी गेल्यावर सुध्दा अनेक लाभार्थी राहून गेले त्यानुसार राज्य शासनाने शबरी घरकुल योजनेत आवश्यक ते नवीन बदल करुन ज्यांना घरांची गरज आहे अशा सर्वांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे. आज या कार्यक्रमात 1 हजार 901 आदिवासी बांधवांना त्यांच्या स्वप्नांचे घरकुल देत असताना मला अत्यंत आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजाच्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ देत असतांना इतर समाजाच्या नागरिकांनाही रमाई घरकुल योजना, मोदी आवास योजना, स्वं. यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आज ज्येष्ठ मंडळींना भजन कीर्तनासाठी भजनी साहित्य देत आहेत. तर क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना क्रीडा साहित्य, बचत गटांना अनुदान देण्यात येत आहे. भगवान बिरसा मुंडा योजनेतून गावागावात पाड्यात रस्ते बांधण्यात येत असून जलजीवन मिशनच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यात मोठया प्रमाणात कामे सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे ज्या भजनी कलावंतांनी राज्य शासनाच्या पेन्शन योजनेसाठी अर्ज केले असतील त्या सर्वांनी भारत सरकारच्या कलावंत पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार काशिराम पावरा म्हणाले की, आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून विविध वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांना साहित्य वाटप व प्रमाणपत्र वितरण केले जात आहे. शिरपूर तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ घेतला नसेल त्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर शिरपूर तालुक्यातील 12 हजार वनपट्टेधारकांना विहीर, पाईपलाईन, मोटारसाठी एकत्रित नविन योजना वनपट्टेधारकांसाठी करावी अशी मागणी त्यांनी आदिवासी विकास मंत्री श्री. गावित यांच्याकडे केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शबरी घरकुल योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी 1 हजार 901 पात्र लाभार्थ्यांना कार्यांरभ आदेशाचे वाटप करण्यात आले. तसेच महिला बचत गटांचे सक्षमीकरणासाठी 283 महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार प्रमाणे 28 लक्ष 30 हजार रक्कमेचे डी.बी.टीच्या माध्यातुन बँक खात्यावर थेट निधीचे निवड प्रमाणपत्र वाटप तसेच 50 क्रिकेट संघांना क्रिकेट साहित्य तर 50 भजनी मंडळांना प्रातिनिधीक स्वरुपात भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी तर सुत्रसंचलन डी.आर.पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.
00000