• Sun. Sep 22nd, 2024

बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ByMH LIVE NEWS

Mar 6, 2024
बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.6 (जिमाका) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. हा देश तरुणांचा देश आहे. या तरुणांना योग्य दिशा आणि रोजगार देण्याचे काम हे शासन करीत आहे. यापुढेही करीत राहील, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

ठाणे येथील मॉडेला मिल कंपाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका येथे कौशल्य विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय रविंद्र सामंत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार किसन कथोरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता, कौशल्य विकास आयुक्तालयाच्या आयुक्त श्रीमती निधी चौधरी, कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर,  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर, भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख, कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आज या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. रोजगार तरुणांना तसेच कुटुंबासाठी महत्वाचा असतो. आज या मेळाव्यात 30 हजार तरुणांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात सरकारच्यावतीने 6 हजार तरुणांना रोजगार दिला जात आहे. नमो महारोजगार मेळाव्यामुळे तरुणांमध्ये उत्साही वातावरण आहे. देशातील पहिले संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधनीचे आज उद्घाटन होत आहे. या केंद्रातून दरमहा 2 हजार मुलांना स्वच्छतेविषयक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासन सर्वांसाठी काम करत आहे. दावोस मधून 3 लाख 73 हजार कोटींचे करार झाले. महाराष्ट्र अनेक विभागात पुढे आहे. राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत 700 दवाखाने सुरू केले. सर्वसामान्य माणसाच्या गरजा काय असतात, त्यांचे दुःख काय असते, याची मला माहिती आहे. म्हणूनच माझ्या इतर सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे.

ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे.  राज्यात केंद्र शासनाच्या मदतीने अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत.  ठाणे येथून लवकरच मेट्रो सुरू होणार आहे. राज्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. शासकीय नोकर भरती बंदी उठवली असून आतापर्यंत 1 लाख नोकऱ्या दिल्या असून 1 लाख स्वयंरोजगार  उभे केले आहेत.  यासाठी 11 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समृध्दी महामार्ग, अटल सेतू यासारखे अनेक प्रकल्प निर्माण होत आहेत. यामुळे रोजगार वाढीसाठी चालना मिळणार आहे. उद्या देखील रोजगार मेळावा सुरु आहे.

मंत्री श्री. लोढा यांनी आपल्या प्रास्ताविकात नमो महारोजगार मेळाव्याची माहिती दिली. राज्यातील हा सर्वात मोठा महारोजगार मेळावा असून या मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला आहे. या मेळाव्यातून तरुणांना मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहे. यापुढेही कौशल्य विकास विभागाकडून अशा प्रकारे बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्धतता हे काम निरंतर सुरु ठेवण्यात येईल.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राज्यगीताने झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 हजार 800 महिलांना शिलाई मशिन आणि घरघंटीचे वाटप, रहिवाशी दाखले, हिट ॲक्शन प्लॅनचे उद्घाटन, उष्ण्ता उपाययोजना कृती आराखडा, महाराष्ट्र स्कोर कार्डचे प्रकाशन असे विविध उपक्रम झाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे ऑनलाईन लोकार्पण

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे लोकार्पण झाले. या प्रबोधिनीच्या माध्यमातून जपान, जर्मनी, इस्राईल आणि फ्रान्स या चार देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच जर्मनी सोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला ज्या द्वारे 5 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे पण इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषा येणे अनिवार्य ठरणार आहे. अशा मागण्या लक्षात घेऊन बाहेर देशातील उपलब्ध रोजगार आणि त्यासाठी आवश्यक भाषाकौशल्य युवकांना मिळावे यासाठी या प्रबोधिनी मध्ये जपानी, हिब्रू, जर्मन आणि फ्रेंच या 4 भाषांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोबतच परदेशात जाण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा इच्छुकांना मिळाव्या यासाठी महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटरची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

बदलत्या डिजिटल युगाच्या गरजांसाठी, स्वयंरोजगारासाठी या प्रबोधिनीच्या माध्यमातून AI सारख्या नाविन्यपूर्ण विषयाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था तसेच स्टार्टप्स साठी इनक्यूबेशन सेंटर ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed