बारामतीत हे कार्यक्रम होत असल्याची माहिती मला पत्रकारांकडूनच मिळालेली आहे.२०१५च्या शासनाच्या जीआरनुसार अशा कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकसभा, राज्यसभा खासदारांचे नाव घालावे लागते. बारामतीत तो प्रोटोकॉल पाळला जातो की नाही, हा प्रश्न आहे. आम्ही सत्तेत असताना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करत होतो. तत्कालीन स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पत्रिकेत नाव नसल्याचे तत्कालीन मंत्री शरद पवार यानी कार्यक्रमाला येणे टाळले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर माझा विश्वास असून ते मला महारोजगार मेळाव्याला बोलवतील अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. महारोजगार मेळाव्याची संकेतस्थळावर नोंदणी होत नाही, OTP येत नाही अशा अडचणी उमेदवारांना येत असून यासंबंधी त्यांच्या कार्यालयाशी बोलणार असल्याचे सुळे यांनी सांगितले. शरद पवार यांनी ५० वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नमो महारोजगार मेळावा होतो आहे. ही संस्था त्यासाठी उपयोगी येते याचा आनंद असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिवाय विकासकामांच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री व मान्यवर येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असेही त्या म्हणाल्या.
आमदार रोहित पवार यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून उभे करायचे हा आमचा कौटुंबिक निर्णय होतो. सर्वांनी एकत्रित बसून तो घेतला होता, असेही त्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या.
आमदारांच्या कामात हस्तक्षेप केला नाही
लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना मी कधीही आमदारांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. केंद्रातील कामांचा मी पाठपुरावा करत होते. आमदार राज्यातील कामांचा पाठपुरावा करायचे. बारामतीतील काम असेल तर मी अजित पवार यांच्याकडे संबंधितांना पाठवायचे. तिच पद्धत इतर तालुक्यात वापरत होते. सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.