• Sat. Sep 21st, 2024

जमिनीवर लिंबू, मिरची, हळद-कुंकू अन् भला मोठा खड्डा, सत्य कळताच पोलिसांनी डोक्याला हात मारला

जमिनीवर लिंबू, मिरची, हळद-कुंकू अन् भला मोठा खड्डा, सत्य कळताच पोलिसांनी डोक्याला हात मारला

गजानन पवार, हिंगोली: गुप्तधनाची लालसा एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे. गुप्तधन मिळवण्याच्या लालसेने घरामध्ये लिंबू, मिरची, हळद-कुंकू याची पूजा करून भला मोठा खड्डा खणून गुप्तधन काढणाऱ्यांचा डाव शेजारच्यांनी उधळून लावला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या ग्रामीण भागातील तुप्पा या गावी ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

तुप्पा येथील शिवप्रसाद आत्माराम सूर्यवंशी यांच्या घरात गुप्तधन असल्याचा भास गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या कुटुंबीयांना होत होता. गुप्तधनाच्या लालसेपोटी त्यांनी एक योजना आखली, तसेच याला लागणारे साहित्य आणि गुप्तधनाचे ठिकाण सांगणारी व्यक्ती यांचा या कुटुंबांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांचा हिंगोली येथील चंद्रभान इंगोले यांच्याशी संपर्क झाला. चंद्रभान इंगोले हे देखील यामध्ये गुप्तधनाच्या लालसेने सहभागी झाले आणि एक-एक करत यामध्ये लागणारी साखळी तयार झाली.

सिद्धेश्वर आणि जांभरुण या ठिकाणचे देखील गुप्तधन काढणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधून यामध्ये सामील करण्यात आले. यामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या पायाळू व्यक्तीचा देखील त्यांनी शोध घेतला. पायाळू असलेल्या अल्पवयीन मुलीला सोबत घेतलं. २७ फेब्रुवारीच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास शिवप्रसाद यांच्या राहत्या घरी गुप्तधन काढण्यासाठी पूजा विधीला सुरुवात केली. यामध्ये हळद-कुंकू, लिंबू, दोरा विधिवत पूजा केली आणि खोदकाम करण्यास सुरुवात करण्यात आली.

खोदकामाचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत पोहोचला. शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. याप्रकरणी, कळमनुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना घराचे दार बंद दिसले. त्यांनी दार ठोठावले असता आतून कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पोलिसांनी थेट दार तोडून आत प्रवेश केला. यावेळी पोलिसांना बघताच आरोपींनी या ठिकाणावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी शिताफीने सर्वांना ताब्यात घेतलं

घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असता घरात दहा ते बारा फुटाचा खोल खड्डा आणि पूजेचे साहित्य दिसून आलं. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून गावकऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी असलेल्या सात जणांना ताब्यात घेतले. जमादार दिलीप पोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गुप्तधनाच्या शोधासाठी दहा ते बारा फुटाचा खड्डा खणून आणि जादूटोणा केल्याप्रकरणी शिवप्रसाद आत्माराम सूर्यवंशी, काशीराम सीताराम जुमडे, मन्सूरखान नबीखान पठाण, दौलतखान शब्बीरखान पठाण, चंद्रभान जळबाराव इंगोले यांच्यासह दोन महिलांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी संजय हिबारे व सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed