• Sun. Sep 22nd, 2024

कृषी विभागासंदर्भातील विविध विषयांचा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

ByMH LIVE NEWS

Feb 26, 2024
कृषी विभागासंदर्भातील विविध विषयांचा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

मुंबई दि. २६ : शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी विभागामार्फत जे काही बदल करता येतील ते कृषी विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मंत्रालयामध्ये किसान संघ प्रतिनिधींच्या निवेदनासंदर्भात आयोजित बैठकीत श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, स्मार्टचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर (दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे), सहसचिव गणेश पाटील, किसान संघाचे चंदन पाटील, बळीराम सोळुंके, राहुल राठी  आणि विविध कृषी विद्यापीठाचे व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले, कृषी विभागाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कृषी विभागाच्या शेतकरी मासिकाद्वारे विविध कृषी योजनांची आणि आधुनिक पद्धतीच्या शेती तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी विभागामार्फत हे मासिक सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे तसेच त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोकणातील नारळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत.

यावेळी किसान संघ प्रतिनिधींच्या निवेदनातील ३२ विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात कृषी विभागांशी संबंधित विषयाबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच पणन, कामगार, उद्योग आणि ऊर्जा विभागांशी संबंधित विषयांवर त्या विभागांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed