पुणे जिल्ह्यातच नव्हे; तर महाराष्ट्रभरामध्ये एचए कंपनीचा मोठा लौकीक होता. या कंपनीच्या माध्यमातून जगभरामध्ये औषध निर्यात केली जात होती. मात्र, सरकारचे उदासीन धोरण आणि औषध निर्मितीतील प्रचंड स्पर्धा यामुळे कंपनी डबघाईला आली. केंद्र सरकारचा उपक्रम असल्यामुळे कामगारांचे सर्व लक्ष केंद्र सरकाराच्या धोरणाकडे लागले आहे. काँग्रेसचे मोहन धारिया, प्रा. रामकृष्ण मोरे, विदुरा नवले, राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे यांनीही एच. ए. मजदूर संघाचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर आता खासदार श्रीरंग बारणे आणि मनोज कोठक हे कंपनीचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडिण्यात अद्याप यश आलेले नाही, अशी टीका शिवसेना मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.
शहरात उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारी कंपनी म्हणून ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’चे नाव घेतले जाते. त्यानंतर अनेक नामवंत उद्योगसमूहांनी येथे युनिट्स स्थापन केली. त्यामुळे या शहराला औद्योगिकनगरीचे बिरुद लाभले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून औषधनिर्मिती करणारी ‘एचए’ आजारी पडली आहे. तिला गरज आहे आर्थिक मदतीची आणि पुनरुज्जीवनासाठी ठोस उपाययोजना करण्याची. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हस्ते १९५६ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर कंपनीत औषधनिर्मिती सुरू झाली. स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर १९६० ते १९८० ही दोन दशके कंपनीची गौरवाची ठरली. याच काळात कंपनीने उत्कृष्ट परफॉर्मन्स दाखवल्याबद्दल अनेक पारितोषिके मिळवली. संशोधन आणि नवनिर्मितीच्या बाबतीतही कंपनीने चांगली कामगिरी बजावली. पण, पेनिसिलिनचे उत्पादन बंद झाल्यानंतर हा उद्योग अडचणीत आला आहे.
एचए कंपनीला आजारी उद्योग म्हणून विशेष पॅकेज’ केंद्र सरकारने दिले पाहिजे. औद्योगिकनगरी, कामगार नगरीचा पाया या कंपनीमुळे रचला आहे. पण, केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे कंपनी तोट्यात आणि कामगार देशोधडीला लागल्याची स्थिती आहे. विद्यमान खासदार यांनी कामगारांना केवळ आश्वासने दिली आणि दिशाभूल केली आहे. कंपनीमध्ये पेनिसिलिन प्लांट, जेन्टमाथासीन प्लांट, आय. व्ही. प्लांट तसेच अन्य इतर प्लांट सुरू करून उत्पादन करण्याबाबत दिलेले प्रस्ताव खासदारांना केंद्राकडे मांडताच आले नाहीत.
कंपनी दिवसेंदिवस अधोगतीकडे निघाली असून, अनागोंदी कारभार आहे. औषध उत्पादन सोडून भलतेच उद्योग सुरू आहेत. कंपनीच्या जागेवर लग्नसमारंभ कार्यालय, पेट्रोल करीता जमिनी भाड्याने देणे असे प्रकार सुरू असताना या भागातील लोकप्रतिनिधी, खासदार मूग गिळून कानाडोळा करीत आहेत.- संजोग वाघेरे, संघटक, शिवसेना (उबाठा)