• Mon. Nov 25th, 2024

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची नाराजी ओढवून घेणे परवडणारे नाही, पुण्यावरील पाणी कपातीचे संकट टळले

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची नाराजी ओढवून घेणे परवडणारे नाही, पुण्यावरील पाणी कपातीचे संकट टळले

    म. टा. प्रतिनिधी, पुणे

    खडकवासला धरण प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असूनही सध्या पुण्यात पाणी कपात न करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने शनिवारी घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर या चार तालुक्यांसाठी उन्हाळी आवर्तन चार मार्चपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसह जिल्ह्यातील मतदारांची नाराजी ओढवून घेणे परवडणारे नसल्यानेच पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

    विविध प्रकल्पांच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात शनिवारी झाली. त्यावेळी पुणे महापालिकेला पाणी कपातीसाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या आहेत. आमदार दत्तात्रय भरणे, राहुल कुल, रवींद्र धंगेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते. त्यावेळी ‘महानगरपालिकेने पाणी बचत करून जलसंपदा विभागाने दौंड, इंदापूरला सिंचनासह पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार भरणे, कुल यांनी केली.

    १५ जुलैपर्यत पाणी राखीव ठेवा

    खडकवासला प्रकल्पात १६.१७ टीएमसी पाणी उपलब्ध असून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी १४.९८ टीएमसी उपलब्ध होत आहे. त्यातून सिंचनासाठी ६.९८ टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. चार मार्चपासून पहिले उन्हाळी सिंचनासाठीचे आवर्तन ४५ दिवसांचे सोडण्यात येणार असून दुसरे आवर्तन हे दौंड नगरपालिका आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे. त्याशिवाय पुणे शहर जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणीसाठ्यातून १५ जुलैपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत.

    गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्य़ा खडकवासला प्रकल्पात तीन टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. तरीही शहराला पुढील किमान पाच महिने पुरेल अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. पाणी कपाती तूर्तास टळली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुढच्या बैठकीत पुन्हा विचार विनिमय होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.

    – रवींद्र धंगेकर, आमदार

    पवनामध्ये पुरेसा पाणीसाठा

    पवना आणि चासकमान प्रकल्पांमध्ये गतवर्षीप्रमाणेच पुरेसा पाणीसाठा आहे. पवना प्रकल्पात ४.८९ टीएमसी पाणी असून पैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत २.९२ टीएमसी औद्योगिक आणि इतर खासगी संस्थांना ०.४६ टीएमसी असा बिगर सिंचनासाठी देण्यात येणार आहे. सिंचनासाठी उन्हाळी हंगामात ०.२५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, असे नियोजन जलसंपदा विभागाने सांगितले.

    पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये २५ वर्षातील सर्वात कमी पाऊस झाला होता. तरीही पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही. जिल्ह्यात शेतीलाही पाणी मिळणार आहे. शेतीसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तन सोडली जाणार असून पहिले आवर्तन तीन मार्चपासून सुरू होणार असून शेतीसाठी सात टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

    – राहुल कुल, आमदार, दौंड

    शेतीसाठी दोन आवर्तने

    चासकमान आणि कळमोडी धरणात एकूण ५.२५ टीएमसी उपयुक्त पाणी आहे. बाष्पीभवन वगळता उन्हाळी हंगामासाठी ३.६३ टीएमसी पाण्यापैकी पिण्यासाठी ०.१३ टीएमसी आणि सिंचनासाठी ३.५ टीएमसी पाणी दिले जाणार आहे. सिंचनासाठी दोन आवर्तने देण्याचे नियोजन असून पहिले उन्हाळी आवर्तन पाच मार्च ते नऊ एप्रिलपर्यंत तसेच पुढील आवर्तन १० एप्रिल ते १५ मे किंवा लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला केल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *