• Sat. Sep 21st, 2024
मोठी बातमी: अजय महाराज बारस्करांवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न

मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले होते. गेल्या तीन दिवसांपासून उभयतांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. हाती आलेल्या माहितीनुसार, मनोज जरागेंविरोधात बोलणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरात त्यांच्यावर मराठा आंदोलकांनी हल्ल्याच्या प्रयत्न केला.मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणारे अजय बारस्कर महाराज यांच्याविरुद्ध सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बारस्कर यांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने होतायेत. बारस्कर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच वास्तव्याला आहेत. विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देतायेत. आज रात्री साडे आठच्या सुमारास चर्चगेट परिसरातून बारस्कर प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, अशी माहिती स्वत: बारस्कर यांनी दिली.

माझ्याविरोधात बोलण्यासाठी बारसकरने ४० लाख घेतले, मला बदनाम करण्यासाठी शिंदे- फडणवीसांचा ट्रॅप | जरांगे


हल्ल्यानंतर जवळच असलेल्या पोलिसांनी हल्लेखोरांना अडवलं आणि ताब्यातही घेतलंय. या सगळ्या घटनेनंतर बारस्कर यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आलेली आहे असं समजतंय.

जरांगे-बारस्करांचे एकमेकांवर आरोप

राज्य सरकारनेच मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी आपल्याविरोधात सापळा लावलेला असून, आज जे मराठा समाजातील आंदोलक आपल्यावर आरोप करीत आहेत ते सरकारचे हस्तक आहेत, असा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी केला.

अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी अजय बारसकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुपारी घेऊन आपल्याविरोधात आरोप केले जात आहेत. बारसकर हे मराठा समाजात फूट पाडत होते म्हणून आपण त्यांना व्यासपीठावरून खाली उतरवले, असे सांगून जरांगे यांनी बारसकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed