नाशिक, दिनांक 23 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र दिंडोरी तालुक्यातील शिवानाई येथे मंजूर झाले आहे. या उपकेंद्रामध्ये आगामी शैक्षणिक वर्षात कॅम्पस सुरू होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा व अत्यावश्यक गरजेच्या कामांना प्रशासनाने गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र दिंडोरी शिवनाईच्या सक्षमीकरणाबाबत आयोजित प्रशासकीय समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र नाशिकचे व्यवस्थापन समिती सदस्य सागर वैद्य, सहायक कुलसचिव श्रीपाद बुरकुले, समन्वयक डॉ. सानप व कार्यकारी अभियंता श्री. ढवळे उपस्थित होते.
शासनाने या उपकेंद्रास जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणी रस्ते, वसतिगृह, विभागांच्या इमारती, कर्मचारी वसाहत इमारत, क्रीडा मैदान, व्यायामशाळा, वृक्षारोपण, सौर प्रकल्प, रस्ते, पाणी पुरवठा, कुंपण आदि विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, आगामी शैक्षणिक वर्षात कॅम्पस सुरू होण्यासाठी शिवनाई गावाच्या मुख्य रस्त्यापासून उपकेंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ता, पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी, वीज पुरवठा व्यवस्था ही अत्यावश्यक गरजेची कामे त्वरित पूर्ण होण्याच्या दृष्टीने तत्काळ पत्रव्यवहार आणि प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश यावेळी दिले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी विकास विभागातील वसतिगृह योजनेसंदर्भात सहकार्य करण्याचे तसेच, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व निधी (CSR)च्या माध्यमातून विद्यापीठ उभारणीला मदत करण्याची ग्वाही दिली.
यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी प्रास्ताविक करीत विद्यापीठ उपकेंद्र कॅम्पस विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सहायक कुलसचिव श्रीपाद बुरकुले यांचा सत्कार करण्यात आला.
00000