नाशिक, दिनांक 23 फेब्रुवारी, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या समाज कल्याण संकुल आवारातील महिला व बाल विकास भवनच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास चंद्रशेखर पगारे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण माधव वाघ, उपायुक्त समाज कल्याण देविदास नांदगावकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनिल दुसाणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद प्रताप पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गायकवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी, विलास कवळे, सचिन शिंदे, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेडकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा संदेशात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, महिला व बाल सशक्तीकरण व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. नाशिक जिल्हा प्रशासकीय इमारती उभारणीमध्ये नेहमीच अग्रेसर आहे. महिला व बाल विकास भवन नूतन इमारतीच्या माध्यमातून महिला बचत गटांना अधिक गती मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजना, अंगणवाडी सेविकांसाठी मोफत शिबीरे, सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच केंद्र व शासनाच्या महिलांसाठी असेलेल्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे भवन उपयुक्त ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्याचा संकल्प करून त्यादृष्टीने गरोदर माता व बालके यांचे अधिकाधिक पोषण, सुविधा उपलब्ध करून नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी
जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय विभागाला भेट देऊन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सर्व विभागांची पाहणी केली.
यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक संदीप कडू यांच्यासह जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
तत्पूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांमार्फत ओपीडी, आयपीडी, किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रिया, गरोदर महिलांची प्रसूती, अपघात विभाग येथे सुरू असलेल्या दैनंदिन कामकाजाची माहिती, यासोबतच रूग्णालयाच्या इमारतींमध्ये रूग्णांना आवश्यक सेवासुविधा तसेच सिंहस्थ कुंभमेळा रूग्णालयात केलेल्या दुरूस्तीचे सादरीकरणाच्या माध्यमातून पालकमंत्री यांना सद्यस्थितीतील माहिती सादर केली.
0000