• Sat. Sep 21st, 2024

नवीन शैक्षणिक धोरणामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ByMH LIVE NEWS

Feb 21, 2024
नवीन शैक्षणिक धोरणामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. २१ (जिमाका) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या विविध संधी निर्माण होवून कौशल्य व व्यावहारिक शिक्षणाला प्राधान्य देण्यात येईल. या शैक्षणिक धोरणामुळे देशात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन स्वयंरोजगारक्षम युवापिढी तयार होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथील सुरक्षाभिंतीचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रविण पोटे-पाटील, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, माजी नगरसेवक तुषार भारतीय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  मुख्य अभियंता गिरीश जोशी, रुपा गिरासे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय मानकर, विभाग प्रमुख डॉ. एस.पी. बुरघाटे, डॉ. एस.पी. बाजड आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे. या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणातील रचनात्मक बदल, अभ्यासक्रमातील सुसूत्रता, अध्यापनाच्या अभिनव पद्धती, मूल्यमापनातील सुधारणा, मातृभाषेतून शिक्षणाच्या संधी, नवीन अभ्यासक्रमांतील एकसमान पद्धती अशा विविधांगी पर्यायांतून नवी शिक्षण व्यवस्था निर्माण होईल. यातून स्वयंरोजगारक्षम युवापिढी तयार होईल. तसेच पारंपरिक शिक्षण पद्धतीतून केवळ बेरोजगारांचे लोंढे तयार न होता विद्यार्थ्यांना कौशल्येही आत्मसात करता येणार आहेत. यामुळे तरुणाईसाठी शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. प्रगत देशामध्ये कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. या शैक्षणिक धोरणामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन रोजगाराचे विविध पर्याय नवयुवकापुढे निर्माण होईल. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुरक्षा भिंतीचे भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुरक्षा भिंतीमुळे वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिंनींच्या सुरक्षिततेमध्ये अधिक भर पडेल. मुलींच्या वसतिगृहामध्ये महिला सुरक्षा गार्ड पूर्णवेळ उपस्थित राहील, यांची संस्थेने जबाबदारी घ्यावी, असेही पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मानकर तर संचालन प्रा. रंजना वानखडे यांनी केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed