• Sat. Sep 21st, 2024
पैशासाठी विवाहितेचा छळ; गरोदर महिलेला मारहाण करत काढलं घराबाहेर, सात जणांवर गुन्हा दाखल

धनाजी चव्हाण
परभणी: मी दोन महिन्यांची गरोदर आहे. आपल्याला बाळ होणार आहे. तुम्ही मला त्रास देऊ नका, असे म्हणत विवाहिता आपल्या पतीसह सासरच्यांना विनवणी करत होती. पण सासरच्यांनी ऐकले नाही. गरोदर विवाहितेस मारहाण करून माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, अन्यथा तुला जीवे मारू, असे म्हणत घराबाहेर काढले. पीडित विवाहिता आपल्या वडिलांच्या घरी आली आणि सासरच्या सात जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचे नाव वैष्णवी नारायण सरवदे (२१) असे आहे. वैष्णवीचा विवाह मे २०२२ मध्ये नारायण सरवदे याच्याशी रितीरिवजाप्रमाणे लावून दिला. लग्नामध्ये संसार उपयोगी समान, तीन तोळे सोने आणि लग्न खर्च म्हणून पाच लाख रुपये देखील देण्यात आले. लग्नानंतर सुरुवातीला काही दिवस वैष्णवीला सासरच्यांनी चांगले नांदवले. दरम्यान काही दिवसानंतर सासरच्यांनी वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिला तू मोबाईलवर जास्त बोलतेस, कोणासोबत बोलतेस म्हणून संशय व्यक्त करण्यात आला. पण वैष्णवीने मी माझ्या आई वडील आणि दोन बहिणींजवळ बोलते, असे सांगितले.
आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचला; मात्र नियतीच्या मनात वेगळंच, तरुणाच्या मृत्यूनं कुटुंबाचा आक्रोश
पतीची नोकरी गेल्यानंतर पैशाचा तगादा
पण सासरच्यांनी तरीही वैष्णवीवर संशय घेण्यास सुरुवात केली. नवरा सासू-सासरे घराबाहेर जात असताना वैष्णवीला घरामध्ये कोंडून ठेवण्यात येत होते. पण तरीही वैष्णवी हा त्रास सहन करत होती. वैष्णवीचा पती नारायण सरवदे हा ज्ञानराधा बँकेत कामास होता. पण अचानक बँक बंद पडली. नारायणची नोकरी गेली आणि त्यानंतर पुन्हा वैष्णवीला त्रास देणे वाढविण्यात आले. वैष्णवीची सासू आणि नणंद वैष्णवीला माहेरहून तुझ्या नवऱ्याला व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला. वैष्णवीने सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. वैष्णवीच्या वडिलांनी देखील जावयाची नोकरी गेल्याचे समजल्यानंतर आपल्या नावावरील काही जमीन विकून पाच लाख रुपये वैष्णवीच्या नवऱ्याला आणून दिले.

वैष्णवीच्या वडिलांनी पैसे देताना सांगितले की माझ्या मुलीला चांगले नांदवा. माझ्या मुलीला त्रास देऊ नका. त्यानंतर काही दिवस सासरच्यांनी वैष्णवीला चांगले देखील नांदवले. पण पुन्हा वैष्णवीला सासरच्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. सासरा रात्री दारू पिऊन येत असे आणि वैष्णवीला शिवीगाळ करत असेल. वैष्णवीने पतीला हा प्रकार सांगितला. पण पतीने देखील वैष्णवीलाच शिवीगाळ केली. वैष्णवीने आपल्या वडिलांना फोन केला आणि ही सर्व माहिती सांगितली. वैष्णवीचे वडील पुन्हा घरी आले. त्यांनी वैष्णवीच्या पतीला आणि सासऱ्यांना माझ्या मुलीला त्रास देऊ नका. मी तुम्हाला मागेही मदत केली आहे, असे म्हणून विनंती करू लागले.

जालन्यात मराठा समाज आक्रमक, जालना अंबड महामार्ग रोखला, बैलगाड्यासह रस्त्यावर

पण वैष्णवीचा पती नारायण आणि त्याच्या वडिलांनी आम्हाला आणखी पाच लाख रुपये द्या. अन्यथा तुमच्या मुलीला घेऊन जा, असे म्हणाले. वैष्णवीच्या वडिलांनी नारायणला आणि त्याच्या वडिलांना विनंती केली की मला आणखी मुली आहेत. मला त्यांची लग्न करायचे आहेत. मी आता तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. कृपया माझ्या मुलीला त्रास देऊ नका, असे म्हणून वैष्णवीचे वडील तेथून निघून गेले. पण वैष्णवीच्या सासरच्यांनी काही ऐकले नाही आणि वैष्णवीला त्रास देतच राहिले. त्रास दिल्याशिवाय आपल्याला पैसे मिळणार नाहीत असा समज सासरच झाला होता. एके दिवशी पती सासू-सासर्‍याने मिळून वैष्णवीला मारहाण सुरू केली.

वैष्णवी आपल्या पतीला विनंती करू लागली की मी दोन महिन्याची गरोदर आहे. माझ्या पोटात आपले बाळ आहे. मला त्रास देऊ नका. आपल्या बाळाचा जीव जाईल. पण वैष्णवीचा पती नारायण आणि सासरच्यांना याची दया आलीच नाही. उलट त्यांनी वैष्णवीला मारझोड करून वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये, तरच घरात प्रवेश देऊ, असे म्हणून घराबाहेर काढून दिले. वैष्णवीला घराबाहेर काढल्यानंतर ही सर्व माहिती वैष्णवीने वडिलांना दिली. वडील वैष्णवीला आपल्या घरी परत घेऊन आले. वैष्णवीच्या वडिलांनी सासरच्यांना फोन करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

मुलीला सासरी घेऊन जाण्याची विनंती देखील केली. पण सासरच्यांनी पाच लाख रुपये घेऊन येत असाल तरच मुलीला घेऊन या, नाहीतर तुमच्याकडेच राहू द्या, असा निरोप पाठवला. दरम्यान वैष्णवीने भरोसा सेल परभणीकडे तक्रार देखील केली. या दरम्यान वैष्णवीला मुलगी झाली. त्या मुलीला देखील पाहण्यास पती नारायण किंवा सासरची कोणीही आले नाही. दहा महिन्याचा कालावधी गेल्यानंतर वैष्णवीने थेट मानवत पोलीस ठाणे गाठले. पती नारायण सरवदे, सासरे सुरेश सरवदे, सासू शोभा सरवदे, ननंद प्रिया कोल्हे, ननंद सोनी शिंदे, नंदई सुभाष कोल्हे, नंदई प्रशांत शिंदे यांच्याविरुद्ध शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed