• Sat. Sep 21st, 2024

अधिक रोजगार संधी आणि कौशल्य विकासावर भर – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

ByMH LIVE NEWS

Feb 15, 2024
अधिक रोजगार संधी आणि कौशल्य विकासावर भर – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 15 : उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांनी मिळवलेल्या रोजगारांमध्ये अधिकाधिक कौशल्य विकसित करण्यावर विभाग भर देत आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियो या ब्रँडसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी पाच वर्षात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील  असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

मंत्रालय दालन येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंट च्या जुडियो ब्रँडसोबत झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, टाटा ट्रेंटच्या जूडियो ब्रँडचे रिटेल अकॅडमीचे प्रमुख सशंथन पदयचे, एच. आर. टीमचे कमलेश खरात, आर प्रिया, पुष्पा गुप्ता यावेळी उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग हा उमेदवार व औद्योगिक संस्था यांच्यामधील दुवा बनून योग्य उमेदवाराला योग्य रोजगार देण्याचे महत्वपूर्ण काम करणार  आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ टाटा ट्रेंट च्या जूडियो ब्रँडसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल. ज्या व्यक्तींनी रोजगार प्राप्त केला आहे त्याला जूडियोसाठी लागणारे अधिकाधिक कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येईल. आगामी पाच वर्षात किमान पाच हजार रोजगार या माध्यमातून निर्माण होतील अशी आशा मंत्री श्री. लोढा यांनी व्यक्त केली.

श्री. लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि  बिव्हिजी (भारत विकास ग्रुप) यांच्यात सामंजस्य करार झाला असून, कोपरी ठाणे येथे पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यात होणार सुरू होणार आहे. स्वच्छ भारत अकादमीमध्ये विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी अभ्यासक्रम शिकवण्यात  येणार असून यासंदर्भातील विविध प्रमाणपत्रे, पदविका व पदवी अभ्यासक्रम निश्चित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि भारत विकास ग्रुप संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अकादमीमध्ये विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

******

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed