• Sun. Sep 22nd, 2024

राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणार जुन्नर येथील ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’

ByMH LIVE NEWS

Feb 15, 2024
राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणार जुन्नर येथील ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि आदर्श विचाराने  कार्यक्षम, प्रगतीशील प्रशासन स्थापन करून मराठी साम्राज्याचा पाया घातला. युद्धशास्त्रात अनेक नवनवीन संकल्पना रुजविल्या. आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली विकसित केली. असे महान राजा, अवघ्या मराठी मनाची अस्मिता,आपले अराध्य दैवत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९४ वी जयंती आपण  दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी  करत आहोत त्याचबरोबर श्री  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्षे साजरे  करत आहोत. दि. १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४  दि.१७ ते १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत आहे.

राज्यातील गड-किल्ले विकासाला चालना देणार : पर्यटन मंत्री गिरीश महाजन

पर्यटनमंत्री गिरीश महाजन म्हणाले, मराठी साम्राज्याचा इतिहास आणि आपली संस्कृती राज्यातील 400 पेक्षा जास्त असलेल्या गड-किल्ल्यांच्या अवतीभोवतीच आहे. आपला समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी दि. १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने, ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ साजरा करत आहोत. तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला सर्वांनी जरूर यावे.

राज्यात असलेले गिरीदुर्ग, भूदुर्ग, जलदुर्ग यांच्या जतन आणि संवर्धनासाठी  केंद्र शासन व राज्य शासनाचे वेगवेगळे कायदे आहेत. केंद्र व राज्य शासनाकडे नोंद असलेल्या आणि खासगी मालक असलेली ठिकाणे वगळून किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर नोंद न झालेल्या किल्ल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. राज्यातील किल्ल्यांच्या विकासकामांना शासन प्राधान्य देत आहे. गड -किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्यालगत पर्यटकांसाठी कॅराव्हॅन कॅम्पिंग, टेन्ट कॅम्पिंग, व्हर्च्युअल रियालिटी च्या माध्यमातून पर्यटकांना गडकिल्ल्यांचा इतिहास सांगता येईल. शिल्प स्वरूपात इतिहास प्रदर्शन उभारणे ही कामे केली जात आहेत. किल्ले पर्यटन धोरण अंतर्गत ही विविध कामेही करण्यात येत आहेत. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये अकरा गड – किल्ले आहे. तर जगभरातील पर्यटक आपल्या देशात येऊन पर्यटनात वाढ होईल. पर्यटनासाठी जिल्हा वार्षिक योजना, सीएसआर आणि प्रादेशिक पर्यटन योजनांच्या माध्यमातून गड किल्ले विकासाला चालना देण्यात येत असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ चे भव्य आयोजन

पर्यटन विभाग पर्यटनाला चालना देण्यासाठी कॅलेंडरवर आधारित विविध पर्यटन उपक्रम राबवत आहे. याच उपक्रमातंर्गत शिवजयंती देखील उपक्रम घेतला असून गेल्या वर्षी  शिवजयंतीला तीन दिवस ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’ मोठ्या उत्साहात साजरा केला.

यंदाही ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ मध्ये तीन टेन्ट सिटी, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्ती व रांगोळी स्पर्धा, गिर्यारोहण प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन,खाद्य महोत्सव विविध स्पर्धा,मंदिर दर्शन,सरोवर निवास, मंदिर दर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून  आपला इतिहास आणि संस्कृती याची माहिती, आपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 राज्यातील गड व किल्ले जतन आणि संवर्धन

मराठा शासन काळात तत्कालीन राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला,या पराक्रमांची साक्ष देणारे महाराष्ट्रातील अभेद्य किल्ले आजही आपल्याला त्यांच्या अस्तित्वातून आपल्या गतवैभवाची साक्ष देतात. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. गडकिल्ले हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. राज्यात जवळपास ४०० किल्ले  आहेत यामध्ये गिरीदुर्ग, भुदुर्ग, जलदुर्ग आहेत. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे ४७ किल्ल्यांची नोंद आहे. तर राज्य पुरातत्व विभागाकडे ५१ किल्ल्यांची नोंद आहे या व्यतिरिक्त महसूल व वन विभागाकडे दोन्ही वगळून ३३७ किल्ल्यांची नोंद आहे यामध्ये काही खासगी मालकीचे पण किल्ले आहेत.किल्ल्यांचे जतन आणि संवर्धंन व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य यांचे स्वतंत्र कायदे आहेत. केंद्र शासनाने राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी राज्याला परवानगी द्यावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

केंद्र व राज्य शासनाकडे नोंद असलेल्या आणि खासगी मालक असलेली ठिकाणे वगळून किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर नोंद न झालेल्या किल्ल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. राज्यातील किल्ल्यांच्या पायथ्यालगत पोहोच रस्ता, पर्यटकांसाठी माहिती केंद्र,पार्किंग, माहिती फलक, स्वच्छता गृह, पर्यटन स्थळ माहिती केंद्र, परिसर सुशोभीकरण, स्थानिक खाद्य पदार्थ  व वस्तू विक्री केंद्र या कामांना प्राधान्य देण्याचा  शासनाचा मानस आहे. पर्यटनासाठी जिल्हा वार्षिक योजना, सीएसआर आणि प्रादेशिक पर्यटन योजनांच्या माध्यमातून गड किल्ले विकासाला चालना देण्यात येत आहे.

किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी प्रयत्न करणार

पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत पर्यटन विभागाने किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. या परिसरातील कृषी पर्यटन केंद्राना नोंदणी प्रमाणपत्रही दिले आहे. जुन्नर तालुका हा २१ मार्च २०१८ मध्ये विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे पर्यटन धारेण २०१६ अंतर्गत विशेष पर्यटन क्षेत्रांना  विविध सवलती दिल्या जातात.

किल्ले शिवनेरीवरील विकासासाठी भविष्यात केंद्र शासनाच्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींमध्ये बदल करून रायगड किल्ल्याप्रमाणे या किल्लाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच भविष्यात किल्ल्याच्या पायथ्यालगत पोहोच रस्ता, पर्यटकांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित माहिती केंद्र, पार्किंग, माहिती फलक, स्वच्छता गृह लाईट आणि साऊंड शो, परिसर सुशोभीकरण ही कामे करण्यात येणार आहेत.

गड – किल्ल्यांसाठी भविष्यकालीन योजना

नव्या पिढीपर्यंत किल्ले आणि इतिहास पोहोचावा यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या सहली आयोजित करणे. एनसीसी, एनएसएस आणि एमसीसी या विद्यार्थ्यांचे कॅम्प गडकिल्ले ठिकाणी आयोजित करणे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने वनसंवर्धन करणे, स्थानिक ठिकाणी निवास न्याहरी योजनांना प्रोत्साहन देणे. राज्यातील किल्ल्यांची आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी करणे यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने गाजलेले गडकिल्ले येणार

 जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले महाराष्ट्रातील ११ गडकिल्ले युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये किल्ले रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे रणझुंजार कर्तृत्व आणि त्यांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले हे सर्व किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तुत्वावर आधारीत संग्रहालय आणि थीम पार्क

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वर्ष साजरे करण्यात येत असल्याने सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ठिकाणी पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित संग्रहालय आणि थीम पार्क  उभारण्याची घोषणा केली होती. यामध्ये गोराई, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, नाशिक व रामटेक येथे ५ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान (थीमपार्क) आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली असून आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. बुलढाणा येथे सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, छत्रपती संभाजीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.

या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीमपार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवसृष्टी उभारणे

राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो, हेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटक व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मौ. वडज, ता.जुन्नर, जि.पुणे येथे जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन १६.८९ हेक्टर आर् मध्ये हे काम होणार असून या माध्यामातून त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाची माहिती त्यांनी केलेल्या  कार्याची संक्षिप्त माहिती पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी  महाराष्ट्र शासनाचा  पर्यटन विभाग स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तर चला, इतिहासाच्या घटनांचा साक्षीदार असलेला ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024’ मध्ये तीन दिवस चालणाऱ्या  महोत्सवाच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होऊया…

शब्दांकन : संध्या गरवारे – खंडारे,

विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed