• Sat. Sep 21st, 2024
अन्न पाण्याचा त्याग, अशक्तपणा, पोटदुखी, मनोज जरांगेंना ग्लानी, प्रकृती अतिशय गंभीर

जालना : मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले आंदोलक नेते मनोज जरांगे यांचे उपोषण गुरुवारी म्हणजे सहाव्या दिवशीही कायम आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्यांनी तपासणी केली होती. काल सकाळी त्यांना सलाइन लावण्यात आले होते. मात्र, ‘सलाइन लावायचे असेल, तर आधी आरक्षणाची अंमलबजावणी करा,’ अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. आज सकाळी त्यांना पाणी पिण्याचा आग्रह अनेकांनी केला. मात्र त्यांच्या गळ्याखाली पाण्याचे घोटही उतरत नव्हते.

मनोज जरांगे यांची प्रकृती नाजूक झालेली असतानाही ते उपोषणावर ठाम आहे. राज्यभरातून आलेले मराठा समाज बांधव, ग्रामस्थ तसेच महिलांनी त्यांना पाणी घेण्याचा आग्रह धरला. मात्र ते पाणी घ्यायला देखील तयार नाहीयेत. त्यांना अशक्तपणामुळे ग्लानी आलेली आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह केल्यानंतर जरांगेंनी दोन घोट पाणी घेतलं. वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर, त्यांना वैद्यकीय उपचारांची विनंती करण्यात आली. मात्र, जरांगे उपोषणावर ठाम आहेत. त्यांना सलाइन लावण्यात आल्यानंतरही त्यांनी संताप व्यक्त केला.
जरांगे पाटलांचं पुन्हा बेमुदत उपोषण, १४ फेब्रुवारीला महाराष्ट्र बंदची हाक; ‘या’ जिल्ह्याचा पाठिंबा

खुलताबादला कडकडीत बंद, जरांगेंना पाठिंबा

खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे मराठा आरक्षणयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण समर्थनार्थ गल्ले बोरगाव कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी दुकानदार यांनी उस्फूर्त पाठिंबा देऊन आपापली दुकाने बंद ठेवली होती. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी; तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

सरकारला धारेवर धरा, जरांगे पाटलांचं समाज बांधवांना आवाहन

आधी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा मगच मी सलाइन लावून घेईन, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतलेला आहे. आरक्षण न देणाऱ्या राज्य सरकारला मराठा समाज बांधवांनी धारेवर धरलं पाहिजे असं आवाहन त्यांनी उपोषण स्थळावरून राज्यभरातील मराठा समाजाला केले. मी एकटा मुंबईत जाऊन बसणार असून, लवकरात लवकर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करूनच परत येणार, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed