• Mon. Nov 25th, 2024

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा

    ByMH LIVE NEWS

    Feb 13, 2024
    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा

    • मुल येथे महाआरोग्य शिबिर; ३१२७ रुग्णांची नोंद
    • १३०७ रुग्णांवर मेघे रुग्णालयात होणार विनामूल्य उपचार

    चंद्रपूर, दि. 13 : नागरिकांना अत्यंत माफक दरांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. कोविड महासाथीच्या काळात आरोग्य यंत्रणेचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले. त्यामुळे गरीबांना परवडतील अशा माफक दरात आरोग्य सुविधा पुरविणे हे आद्य कर्तव्य असल्याची जाण ठेवत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मूल येथे हजारो नागरिकांची निःशुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली.

    सुधीर मुनगंटीवार तथा वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुल येथे महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात 3127 रुग्णांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर कर्मवीर महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. तपासणीदरम्यान पुढील वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या 1307 रुग्णांना वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या इस्पितळात दाखल करण्यात येणार आहे.

    मुल येथील कर्मवीर महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबिरासाठी दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी सहकार्य केले. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या शिबिरात तपासणीनंतर उपचारांची गरज असलेल्या रुग्णांवर सावंगी मेघे येथील रुग्णालयात विनामूल्य उपचार करण्यात येणार आहे. मुल ते सावंगी मेघे येथे जाण्यासाठी रुग्णांना मोफत वाहन व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात येणार असून योग्यवेळी वैद्यकीय तपासणी व पुढील उपचाराबद्दल अनेक रुग्णांनी यावेळी पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

    ००००००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *