पुणे,दि.९:- विमानाने प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्याच्या लौकिकास साजेल अशा पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना उच्च आणि जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची आणि तेथील सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी आमदार सुनिल टिंगरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, भारतीय विमानतळ प्राधिकारणाचे सरव्यवस्थापक पी.के.दत्ता, विमानतळ संचालक संतोष डोके व संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, नवीन विमानतळ टर्मिनल पुण्याच्या वैभवात भर घालणारे आहे. देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी पुणे येथे येतात. या नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांच्या संख्येत आणि विमानांच्या फेऱ्यांमधे वाढ होणार असून त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या टर्मिनलमुळे विमान प्रवास क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. पुण्यातून देशांतर्गत आणि विदेशी विमान प्रवासाची मोठी सोय या टर्मिनलमुळे उपलब्ध झाली असून भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करण्यात आला आहे.
नव्या टर्मिनलमुळे प्रवासी तसेच व्यावसायीक सुविधा वाढणार आहेत. विमानळ परिसरात आकर्षक इनडोअर प्लँटस् लावावे, राज्यातील आणि पुण्यातील महत्वाच्या वारसा स्थळांची माहिती मराठी भाषेसह इंग्रजी भाषेत प्रदर्शित करावी, स्वच्छतेला प्राधान्य द्यावे अशा सूचना श्री.पवार यांनी यावेळी केल्या. त्यांनी एअरोब्रिज, विमान पार्किग, खाजगी विमान पार्किंग, चेक इन काऊंटर, व्हीआयपी लाऊंज, बॅगेज हँडलींगसह इतर सुविधांची पाहणी केली व माहिती घेतली.
विमानतळ संचालक श्री.डोके यांनी प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधा, आगमन-निर्गमन व्यवस्था, वाहनाची पार्किंग, बॅगेज हँडलिंग सिस्टीम, लाऊंज व अन्य सुविधांची आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या सुविधा तसेच जून्या विमानतळाच्या नूतनीकरणाबाबत माहिती दिली.
०००